महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला भवितव्याची चिंता; समर्थकांत एकच संभ्रम

By नारायण जाधव | Published: April 12, 2023 07:15 PM2023-04-12T19:15:29+5:302023-04-12T19:15:55+5:30

गणेश नाईक/मंदा म्हात्रे जागा सोडतील का? शिंदे समर्थकांत संभ्रम असून ही चिंता जागोजागी व्यक्त करताना दिसत आहेत.

Shinde group worried about future in municipal elections; One confusion among supporters | महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला भवितव्याची चिंता; समर्थकांत एकच संभ्रम

महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला भवितव्याची चिंता; समर्थकांत एकच संभ्रम

googlenewsNext

नवी मुंबई : राज्यात एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. यात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले असले तरी पक्षाने भाजपसोबत घरोबा केला आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील एक महत्त्वाची आणि श्रीमंत महापालिका असलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या ताकदीसमोर आपले भवितव्य काय याची चिंता शिंदेसोबत गेलेल्या माजी नगरसेवकांसह पदाधिकार्यांना सतावू लागली आहे. कारण नवी मुंबईत गणेश नाईक यांचे गेल्या २५ वर्षांपासून एकहाती वर्चस्व आहे.

पक्ष कोणताही असला तरी नाईक यांनी महापालिकेवरील पकड सैल होऊ दिलेली नाही. आता ते भाजपात आहेत, सोबत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंचा गटही आहे. यामुळे भाजप आपल्याला किती जागा देईल, याबाबत शिंदे गटात संभ्रम आहे. नवी मुंबईत २०१५ व्या निवडणुकीत नाईक गटाचे मोठे संख्याबळ होते तर शिवसेना ४४ जागावंर थबकली होती. आता विजय चौगुले आणि उपनेते विजय नाहटांसोबत काही नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. या दोन्ही नेत्यांसोबत नाईक यांचे फारसे सौख्य नाही. तसेच विजय चौगुले सोडले आणि काही प्रमाणात किशोर पाटकर, सुरेश कुलकर्णी आणि शिवराम पाटील सोडले तर शिंदे सोबत गेलेल्या एकही माजी नगरसेवक निवडून येईल काय याची शाश्वती कुणालाही नाही.

चौगुले स्वत:च्या बळावर ऐरोलीत आणखी दोन-तीन जागा आणू शकतात. यापुढे शिंदे गटाची मजल नाही. त्यातच कट्टर शिवसैनिकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंसोबत आहे. मुस्लिम समाजाची सहानुभूतीही ठाकरे गटाला आहे. याशिवाय गणेश नाईक यांनी तीन वर्षांपासून स्वबळावर भाजपचे कमळ नवी मुंबई महापालिकेवर फुलविण्याची तयारी केली आहे. तसा ‘शब्द’ही त्यांनी आपले नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यानुसार केवळ गणेश नाईकच नव्हे तर त्यांचे पुत्र संजीव आणि संदीप नाईक यांनीही शहर पिंजून काढले आहे.

प्रत्येक वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी नेतेपदाची शाल काढून ते दर पंधरवड्याला महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडत आल्या आहेत तर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलपासून स्मार्ट व्हिलेज, जलवाहतूक, प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा मालमत्ताकर, जेट्टींचे विषय, महापालिकेतील नोकऱ्यांचा विषय, महाराष्ट्र भवन, वृद्धाश्रम, सिडको इमारतींचा पुनर्विकास,असे अनेक विषय सतत लावून शहरांत भाजपची ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही या नेत्यांना दोन्ही नेत्यांना सातत्याने बळ दिले आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते आणि भाजपचे श्रेष्ठी आपल्या गटाला किती जागा सोडतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी किती प्रयत्न करतील, याबाबत शिंदे समर्थकांत संभ्रम असून ही चिंता जागोजागी व्यक्त करताना दिसत आहेत.

Web Title: Shinde group worried about future in municipal elections; One confusion among supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.