नवी मुंबई : सिडको आणि मेरीटाइम बोर्डाच्या संयुक्त सहकार्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या बेलापूर ते गेटवे आॅफ इंडिया दरम्यानच्या जलवाहतुकीचा प्रकल्प दृष्टिपथात आला आहे. लवकरच बेलापूर येथे जेट्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. बेलापूरसह नेरुळ आणि वाशी येथूनही मुंबईला जाण्यासाठी हॉवर्डक्राफ्ट सेवा सुरू करण्याची योजना आहे.रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण आणि वाहतूककोंडीची समस्या यावर जलवाहतुकीचा पर्याय उत्तम मानला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सागरी मार्गाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केले आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे. तसेच मुंबईच्या समुद्रात सागरी बसची चाचणीही घेण्यात आली आहे. मुंबईप्रमाणेच नवी मुंबईला ६० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे, त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना सागरी मार्गाने जोडल्यास रस्ते वाहतुकीवरील ताण हलका होणार आहे, तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदराच्या विस्ताराच्या दृष्टीने प्रस्तावित सागरी मार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानुसार सिडको व मेरीटाइम बोर्डाने प्राथमिक कार्यवाही सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बेलापूर येथे जेट्टी उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने नेरुळ आणि वाशी येथे जलवाहतुकीसाठी जेट्टी उभारल्या जाणार आहेत. सध्या निर्माण झालेल्या काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यास, पुढील वर्षभरात नवी मुंबई ते मुंबई दरम्यान प्रत्यक्ष हॉवर्डक्राफ्ट सेवा सुरू करणे शक्य असल्याचे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केले आहे.बंद पडलेली सेवा सुरू होणारवाशी ते गेटवे आॅफ इंडिया दरम्यान काही वर्षांपूर्वी हॉवर्डक्राफ्ट सेवा सुरू करण्यात आली होती; परंतु प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आणि कामगारांचे प्रश्न आदीमुळे ही सेवा बंद पडली होती, तेव्हापासून हॉवर्डक्राफ्ट सेवा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.अत्याधुनिक हॉवर्डक्राफ्टचा होणार समावेशनवी मुंबई ते मुंबई दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या जलमार्गावर अत्याधुनिक दर्जाच्या हॉवर्डक्राफ्ट धावणार आहेत. खराब हवामानातही या हॉवर्डक्राफ्ट सुरक्षित प्रवास करू शकणार आहेत. त्याद्वारे बेलापूर ते गेटवेपर्यंतचे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.
बेलापूर ते गेटवे दरम्यान जलवाहतूक दृष्टिपथात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 4:54 AM