नवी मुंबई : पनवेल शहरात यावर्षी शिवजयंतीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. पनवेल महापालिकेने स्वत: या उत्सवात पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता होणार आहे.मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शाळा गटातील लेझीम पथकांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात शिवाजी महाराज यांच्या चित्ररथाची संकल्पना मांडण्यात येणार आहे. तरी सर्व महाविद्यालये,शाळा, सामाजिक संस्थांना यात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका देण्यात येणार आहेत. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची डागडुजी, रंगकाम, परिसर स्वच्छता कामे, ठिकठिकाणी होर्डिंग व बॅनर लावण्यात येणार आहेत. तसेच ढोल-ताशे पथकांची व्यवस्था असून महानगरपालिका हद्दीतील शाळांना मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सूचित केले आहे. तसेच चित्ररथ तयार करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर रांगोळीने व फुलांची सजावट करण्यात आली आहे व मिरवणूक मार्गावर वाहनांच्या पार्किंगची गैरसोय होवू नये म्हणून अतिक्रमण पथकातील कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या चित्ररथांना पारितोषिक देण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील व पनवेल तालुक्यातील सर्व इच्छुक शाळा,महाविद्यालये, संस्था, मंडळे यांनी चित्ररथांचा समावेश करण्यासाठी प्रवेशिका १८ फेब्रुवारी २०१७पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पनवेलमध्ये जल्लोषात होणार शिवजयंती
By admin | Published: February 16, 2017 2:10 AM