शिवसैनिकांनी पाठलाग करून चोरट्यास पकडले
By admin | Published: April 30, 2017 03:55 AM2017-04-30T03:55:16+5:302017-04-30T03:55:16+5:30
कळंबोलीत लग्नासाठी बँकेतून पैसे काढून घरी जात असलेल्या महिलेच्या हातामधील पैशांची बॅग चोरट्यांनी हिसकावून पळ काढला.
नवी मुंबई : कळंबोलीत लग्नासाठी बँकेतून पैसे काढून घरी जात असलेल्या महिलेच्या हातामधील पैशांची बॅग चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. येथे उभ्या असलेल्या शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार पाहून तत्काळ चोरट्यांचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
नवी मुंबईमध्ये बँकेतून पैसे घेऊन येणाऱ्या नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढू लागले आहे. पैसे भरत असताना ते मोजण्याच्या किंवा त्यांचे नंबर नोंद करण्याचे कारण देऊन ते हिसकावून नेले जात आहेत. बँकेतून पैसे घेऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या हातामधून बॅगही हिसकावली जात आहे. शनिवारी दुपारी कळंबोलीमधील अभ्युदय बँकेतून एक महिलेने लग्नासाठी २० हजार रुपये काढले होते. पैसे घेऊन घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातामधील बॅग हिसकावून नेली. महिलेने आरडाओरड केला असता तेथून जाणाऱ्या शिवसेना नेते बबन पाटील. गिरीश धुमाळ, भानुदास कोळी व इतर पदाधिकाऱ्यांनी ऐकले. शिवसैनिकांनी तत्काळ चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चोरट्याला बेदम मारहाण करून कळंबोली पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवसैनिकांच्या दक्षतेमुळे चोरटा गजाआड गेला असून या कामगिरीसाठी संबंधित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.
नवी मुंबईमध्ये सोनसाखळी चोरी व कारची काच तोडून आतमधील लॅपटॉप पळविण्याच्या घटना वाढत आहेत. याबरोबर बँकेतून पैसे घेऊन जाणाऱ्यांची बॅग हिसकावण्याच्या घटनाही वारंवार घडत आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरटे धुमस्टाइल मोटारसायकल चालवून बॅग किंवा दागिने हिसकावतात व क्षणाचाही विलंब न लावता पळून जातात. काही क्षणात व वेगामध्ये ही घटना घडत असल्याने चोरट्यांना पकडता येत नाही. चोरटे आलेल्या मोटारसायकलचा नंबरही मिळत नसल्याने त्यांचा शोध घेणे अवघड होत आहे. शिवसैनिकांनी धाडसाने चोरट्यांना पकडल्यामुळे त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला जात आहे. याशिवाय इतर नागरिकांनीही दक्षता दाखवावी व कायदा हातात न घेता आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आवाहन केले जात आहे.