युतीमुळे नवी मुंबईत शिवसेना खिळखिळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:38 AM2019-10-26T00:38:01+5:302019-10-26T00:38:16+5:30

कार्यकर्त्यांचेही खच्चीकरण; उरणमधील एकमेव आमदारही गमावला; भाजपची मजबूत पकड

Shiv Sena agitates in Navi Mumbai due to the alliance | युतीमुळे नवी मुंबईत शिवसेना खिळखिळी

युतीमुळे नवी मुंबईत शिवसेना खिळखिळी

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये युतीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे. चारपैकी तीन जागा भाजपला देण्यात आल्या. उरणमधील एकमेव जागा शिवसेनेला देण्यात आली; परंतु तेथेही भाजपमधील बंडखोर उमेदवार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे शिवसेना खिळखिळी झाल्याचे चित्र निर्माण झाले असून पुढील वर्षी नवी मुंबईत होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्येही त्याचा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट आहे.

नवी मुंबई हा १९९० ते २००४ पर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला होता. सलग तीन वेळा बेलापूर मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. १९९५ मध्ये महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्येही पहिला महापौर शिवसेनेचाच झाला. पनवेलमध्येही शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठी होती. उरणमध्ये २०१४ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर निवडून आले होते. या परिसरामध्ये पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे अस्तित्वही नव्हते.

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये २००५ च्या निवडणुकीमध्ये भाजपचा एक नगरसेवक आला होता. २०१० च्या निवडणुकीमध्येही एकच नगरसेविका निवडून आली. देशातील सर्वात महत्त्वाचा परिसर असलेल्या नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी परिश्रम करण्यास सुरुवात केली.

२०१४ च्या निवडणुकीमध्ये पनवेलमध्ये काँगे्रसचे प्रशांत ठाकूर व बेलापूरमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या मंदा म्हात्रे यांना पक्षात प्रवेश देऊन दोन्ही मतदारसंघ ताब्यात घेतले. पनवेल महानगरपालिका व उरण नगरपालिकाही ताब्यात घेतली. नवी मुंबईमध्ये एक आमदार असला तरी महापालिकेमध्ये सत्ता नसल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक व त्यांच्या ४८ नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन नवी मुंबई महापालिकाही ताब्यात घेतली.

युतीच्या जागावाटपामध्ये नवी मुंबईमधील एक जागा शिवसेनेला मिळालीच पाहिजे होती; परंतु पक्षाच्या नेत्यांनी त्यासाठी फारसा आग्रह धरला नाही व जिंकून येणारे ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडले. दोन्ही मतदारसंघ सोडल्यामुळे महापालिका क्षेत्रातील शिवसेना खिळखिळी होईल, असे येथील पदाधिकाऱ्यांनी सांगूनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष दिले नाही. परिणामी, नवी मुंबईवर भाजपचे पूर्ण वर्चस्व निर्माण झाले आहे.

नवी मुंबईमध्ये शिवसेनेने बंडखोर उमेदवार उभा केला नाही. बेलापूरमधील बंडखोर उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. पनवेलमधूनही शिवसेनेच्या बबन पाटील यांनाही माघार घेण्यास भाग पाडले; परंतु उरणमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नाही. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे पदाधिकारी सोबत असल्यामुळेच बालदी यांनी विजय मिळवून सेनेला धक्का दिला. युतीमुळे शिवसेनेला लाभ झाला नसून भविष्यातही फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता

नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकाºयांमध्ये युती जाहीर झाल्यानंतर अस्वस्थता निर्माण झाली आहे. पदाधिकाºयांनी रोडवर उतरून आंदोलन केले. एकतरी मतदार संघ मिळावा, अशी मागणी केली होती. नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघातून १९९०, १९९५ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर गणेश नाईक यांनी विजय मिळविला होता. १९९९ मध्ये सीताराम भोईर विजयी झाले होते. महापालिकेवरही सत्ता मिळविली होती. २०१४ च्या निवडणुकीमध्येही शिवसेना उमेदवारांना चांगली मते मिळाली होती. २०१५ च्या निवडणुकीमध्ये विजय मिळण्याची खात्री असताना युतीमुळे उमेदवारीपासूनच वंचित राहवे लागले.

महापालिकेमध्येही बसणार फटका

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक २०१५ मध्ये होत आहे. शहरात भाजपचे दोन आमदार असून जवळपास ६४ नगरसेवक झाले आहेत. काँगे्रसचे चार नगरसेवकही भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे येणाºया महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर पक्षांचे नगरसेवक शिवसेनेत येण्यास उत्सुक होते; परंतु ते आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

अंतर्गत गटबाजीचा फटका

नवी मुंबईमधील शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका संघटनेला बसला आहे. नवी मुंबईमधील एकतरी मतदारसंघ मिळावा. नाही मिळाला तर बंडखोर उमेदवार उभा करावा, अशी शिवसैनिकांची इच्छा होती; परंतु बंडखोर उमेदवार उभा करण्यास शिवसेनेतीलच काही नेत्यांनी विरोध केला. परिणामी, भाजपचा व इतरांचा प्रचार करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय उरला नाही. शिवसेनेचे सर्वात मोठे नुकसान अंतर्गत गटबाजीमुळेच झाले असल्याची प्रतिक्रिया पक्षाचेच काही पदाधिकारी व्यक्त करत असतात.

भाजप नेत्यांनी करून दाखवले

नवी मुंबई, पनवेल व उरण हा देशातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा आहे. पुढील पाच वर्षांमध्ये या परिसरामध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. ‘नैना’च्या माध्यमातून येथे नवीन शहरे वसविली जात आहेत. या परिसरातील राजकारणावर यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, शेतकरी कामगार पक्ष व काँगे्रसची पकड होती. २०१४ पर्यंत या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे अस्तित्वच नव्हते.

मागील पाच वर्षांत भाजपने या परिसरावर लक्ष केंद्रित करून संपूर्ण परिसर भाजपमय करून टाकला. महामंडळावर पदाधिकारी नेमतानाही नवी मुंबईला झुकते माप दिले. कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधान परिषदेवर घेतले. गणेश नाईक यांच्यासह प्रशांत ठाकूर यांनाही भाजपमध्ये घेऊन पक्ष बळकट केला; परंतु दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी मात्र कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. विधानसभेसाठी नवी मुंबईमधील एक मतदारसंघही मिळविता आला नाही, यामुळे शिवसेना पदाधिकारीच नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

Web Title: Shiv Sena agitates in Navi Mumbai due to the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.