शिवसेना स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा, फोडाफोडीचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:37 AM2020-03-07T00:37:39+5:302020-03-07T00:37:43+5:30
शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोण, कोणाचे किती नगरसेवक फोडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीची स्पर्धा सुरू झाली आहे. शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक राजेश शिंदे यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोण, कोणाचे किती नगरसेवक फोडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. सत्ता मिळविण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आतापर्यंत भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. अजून काही नगरसेवक भाजपला सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेही सेनेमधील नाराज पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यास सुरुवात केली आहे. तुर्भे स्टोअर्समधील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक राजेश शिंदे यांनी शुक्रवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. तुर्भे परिसराच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा दिला असून त्या वेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने सीवूड, तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली परिसरातील नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांना फोडण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे काही नगरसेवकही भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.
शिवसेना व राष्ट्रवादीनेही भाजपचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे. सीवूड, कोपरखैरणे व तुर्भेमधील काही नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाली असून पुढील आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
>शेवटच्या टप्प्यात समीकरणे बदलणार
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पक्षांतराचे प्रमाण वाढणार आहे. महाविकास आघाडी झाल्यास शिवसेनेच्या अनेकांना तिकिटापासून वंचित राहावे लागणार आहे. नाराज झालेले शिवसेना पदाधिकारी २०१५ प्रमाणे पुन्हा बंडखोरी करणार असल्याच्या प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारीच खासगीत देऊ लागले आहेत.
>ऐरोली मतदारसंघावर लक्ष
भारतीय जनता पक्षाने ऐरोली मतदारसंघामधील शिवसेनेचे काही नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे. घणसोली ते कोपरखैरणे दरम्यान पाच नगरसेवक भाजपमध्ये येतील, असे काही पदाधिकारी खासगीत सांगत आहेत. कोपरखैरणेमध्ये भाजपचे एक किंवा दोन नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करतील, असा दावाही केला जात असून शिवसेनेने दिघा परिसरातील नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे.