अंतर्गत कलहामुळेच शिवसेना नवी मुंबईतील सत्तेपासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:43 AM2021-01-03T01:43:03+5:302021-01-03T01:43:17+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविली. परंतु १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून पुन्हा महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. आमंत्रणपत्रिकेच्या वादावरून सोशल मीडियावरून आक्रमकपणे प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे. शिसेनेतील हे मतभेद नवीन नसून वीस वर्षांपासून अंतर्गत कलहामुळेच पक्षाला महानगरपालिकेतील सत्तेपासून वंचित राहावे लागले आहे. नेत्यांमधील या मतभेदामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून विसंवाद थांबविण्याचे आव्हान ठाण्यातील पक्षाच्या नेत्यांसमोर उभे राहिले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविली. परंतु १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून पुन्हा महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. प्रत्येक प्रभागात पक्षाची बांधणी असताना व अनेक वेळा अनुकूल वातावरण असूनही पक्षाच्या नेत्यांमधील अंतर्गत कलहामुळेच महापालिका व विधानसभा निवडणुकीमध्येही पक्षाला अपयश येऊ लागले आहे. यावर्षीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक समर्थक नगरसेवकांना फोडून पक्षात आणण्यास सुरुवात केली आहे.
तुर्भेमधील सुरेश कुलकर्णी, दिघामधील गवते कुटुंबीय यांना शिवबंधन बांधून पक्षाची ताकद वाढविली असताना पुन्हा स्थानिक नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. निमंत्रणपत्रिकेवर नाव नसल्यामुळे विजय नाहटा समर्थक आक्रमक झाले आहेत. समाज माध्यमांमध्ये पक्षाच्याच इतर नेत्यांचा निषध सुरू झाला आहे. वास्तविक अनेक महिन्यांपासून हे मतभेद सुरूच होते.
गतवर्षी महाविकास आघाडीच्यावतीने आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्यासाठीच्या खर्चासाठी निधी उपलब्ध होऊ नये व आयोजक कोंडीत सापडावेत, असा प्रयत्नही पक्षातीलच काही नेत्यांनी केल्याची चर्चा आहे. कारणे अनेक असली तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या मतभेदामुळे प्रामाणिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून हे मतभेद लवकर मिटावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीतही अपयश
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी २००७ मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून विजय चौगुले यांना शिवसेनेत आणून स्थायी समिती सभापतीपद मिळविण्याची रणनीती आखली. परंतु पक्षातीलच एका गटाला ही रणनीती न पटल्यामुळे अनंत सुतार हे आठ नगरसेवकांसह राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले व शिवसेनेची सत्ता मिळविण्याचे स्वप्न भंग पावले.
निवडणुकीतही अपयश
विधानसभेच्या २००९च्या निवडणुकीमध्ये ऐरोली मतदारसंघातून विजय चौगुले यांना अनुकूल वातावरण होते. परंतु पक्षातीलच एका गटाने विरोधात काम केले व या कुरघोडीच्या राजकारणामुळे शिवसेना उमेदवाराचा ११९५७ मतांनी पराभव झाला. अंतर्गत कलहाचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता.
मध्येही झाला होता विसंवाद
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये ऐरोली मतदारसंघातून विजय चौगुले व बेलापूर मतदारसंघातून विजय नाहटा निवडणूक लढवत हाेते. परंतु एकाच शहरातील दोन मतदारसंघ असूनही प्रचारामध्ये संवाद नव्हता. दोन्ही मतदारसंघात अपयश मिळाले. बेलापूर मतदारसंघातही पक्षातील गटबाजीने सेना उमेदवाराचा निसटता पराभव झाला.
सर्वाधिक
बंडखोरी
विधानसभा निवडणुकीनंतर २०१५च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही शिवसेनेतील मतभेद ऐरणीवर आले. युतीमुळे तिकीट न मिळालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखाेरी केली. यामुळे युतीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला व शिवसेनेचे महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.