पनवेल : आर्थिक व्यवहारातून सेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. बंडखोर आमदारांच्या सोबत सेनेचा एकही शिवसैनिक नाही. यामुळे बंडखोरांना याची किंमत मोजावी लागत असल्याचे सांगून बाळासाहेबांच्या नावाचा वापर ते करीत असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री व सेनेचे नेते अनंत गीते यांनी शनिवारी खारघर येथे रायगड जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला.
भाजपने राजकारण करणे थांबवावे; शिवसेनेच्या गळ्याला नखे मारण्याचे काम त्यांनी करू नये. तर शिवसेना ही महाराष्ट्राची गरज नाही, हिंदू राष्ट्राची गरज आहे, देशाची गरज आहे, त्यामुळे कोणीही गद्दारी केली तरी शिवसेना डगमगणार नाही, एकसंध होऊन पुन्हा उभारी घेईल, असेही गीते म्हणाले.
या बैठकीत जिल्ह्यांतील जवळपास २०० पेक्षा जास्त महत्त्वाचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख, शहर प्रमुख उपस्थित होते. यात खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, बबन पाटील, विलास चावरी, सदानंद थरवळ, माजी आमदार मनोहर भोईर, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे, उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश राहाळकर, रामदास शेवाळे यांचा प्रामुख्याने समावेश होता.
आमदारांचे पुतळे जाळून घोषणाबाजीया बैठकीप्रसंगी शिवसैनिकांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांचे पुतळे जाळून घोषणाबाजी केली. रायगडचे शंभर टक्के पदाधिकारी शिवसेनेसोबत असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले. आम्हाला वरिष्ठांकडून ज्या प्रकारचे निर्देश प्राप्त होतील, त्यानुसार पुढील आंदोलनाची भूमिका ठरविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गद्दारांना वेशीवरच अडवाश्रीरंग बारणे यांनी पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, या गद्दारांना वेशीवरच अडवण्याचे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे. या पुढची निवडणूक ही आव्हानात्मक निवडणूक असणार आहे. त्यामुळे कोणीही बेईमानी न करता एकनिष्ठ राहून पक्षप्रमुख जो उमेदवार देतील, त्याला निवडून आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे सांगितले.
अनेक गिधाडे पक्षात आली व गेली; पण शिवसैनिक ठाम आहे, ते मातीत मिळाल्याशिवाय राहणार नाही. गद्दारी करणाऱ्यांचे पुतळे म्हणूनच जाळले आहेत. - शिरीष घरत, जिल्हाप्रमुख, पनवेल