नवी मुंबई : पहिल्यांदाच नवी मुंबईमध्येभाजपाचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक भाजपाचे नेते उपस्थित आहेत. यावेळी महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार हे खुर्चीसाठी एकत्र आले आहे. हे अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही, असे सांगत जे. पी. नड्डा यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी एक अवास्तव आणि अनैसर्गिक आहे. हे अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही. त्यामुळे भाजपाला संधी प्राप्त झाली असून पूर्ण ताकदीने आता विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू, असे सांगत करत भविष्यात युती न करता महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येईल, असा विश्वास जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.
याचबरोबर, भाजपाने आपली विचारसरणी बदलली नाही. इतर पक्षांनी बऱ्याचदा प्रसंगी आपली वैचारिक भूमिका बदलली आहे. आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. मात्र, 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' यासाठी वचनबद्ध आहोत, असेही जे. पी. नड्डा म्हणाले.
याशिवाय, जे. पी. नड्डा यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, " कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. 370 कलममुळे फुटीरवाद्यांना बळ मिळत होते, अतिरेकी गतिविधी होत होत्या. जम्मू काश्मीरमध्ये आता देशातील कायद्यांची अंमलबजावणी होईल. तसेच, जम्मू काश्मीर बँकेची सुद्धा चौकशी होईल आणि ज्यांनी भ्रष्टाचार केले आहेत, ते जेलमध्ये जातील."
दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून भाजपाच्या प्रमुख नेत्यांसह जवळपास अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याचे समजते. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला असून, या अधिवेशनामुळे पक्षाला लागणारी गळती थांबणार का? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.