शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ
By admin | Published: May 13, 2017 01:22 AM2017-05-13T01:22:03+5:302017-05-13T01:22:03+5:30
शिवसेनेने पनवेल शहर महापालिकेची पहिली निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार, ११ मे रोजी प्रचाराचा नारळ फोडला
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : शिवसेनेने पनवेल शहर महापालिकेची पहिली निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार, ११ मे रोजी प्रचाराचा नारळ फोडला. सेनेला प्रचारात शहरातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून सेनेचे संपर्क प्रमुख होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांना पाहण्यासाठी महिलावर्गाची मोठी गर्दी होत आहे.
महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शेकाप विरु द्ध भाजपा अशी मुख्य लढत पाहायला मिळत आहे. शिवसेनाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेऊन पनवेलमध्ये ताकद आजमावत आहे. खारघर प्रभाग पाचमधील बेलपाडा गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेतल्यावर शिवसेनेने प्रचाराला सुरुवात केली. यावेळी सेनेचे रायगड उपजिल्हा प्रमुख शिरीष घरत हे उपस्थित होते. बांदेकर मतदारांशी संवाद साधत असल्याने सेनेच्या प्रचार फेऱ्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला निवडणुकीच्या प्रचारसभेत उतरविण्याच्या तयारीत आहे. खारघरमध्ये देखील मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार शिवसेनेनेही सभेची आखणी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह अनेक नेते प्रचारात दिसण्याची शक्यता आहे.