पनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना युती होते की शिवसेना स्वबळावर लढणार याबाबतचे चित्र अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र येत्या चार ते पाच दिवसांत शिवसेना युती करणार की स्वबळावर लढणार याबाबत निर्णय घेणार असल्याचे मत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पनवेल महापालिकेच्या रिंगणात शिवसेनेला स्वबळावर लढण्याचे सूतोवाच दहा ते बारा दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र पनवेलमधील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांचा भाजपासोबत युती करावी असा आग्रह आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली असली तरी देखील शिवसेनेला ठोस निर्णय घेता आल्याचे दिसत नाही. त्यामुळे शिवसेना सावध पावलं उचलत आहे. भाजपासोबत युती करावी की स्वबळावर लढावे या विवंचनेत शिवसेना सापडली आहे. शिवसेना स्वबळावर लढली तर त्यांना महापालिका क्षेत्रातील आपल्या ताकदीचा अंदाज येणार आहे व भविष्यातील निवडणुकीसाठी तो फायदेशीर ठरू शकतो. युतीसंदर्भात अद्यापही शिवसेना तळ्यात मळ्यात असल्याने शिवसैनिक मात्र अजूनही संभ्रमात आहे. तर दुसरीकडे जागा कमी देत असल्याने शिवसेना भाजपा युतीचे घोंगडे भिजत पडले असल्याचे वृत्त आहे. भाजपा शिवसेनेला २२ जागा सोडत असून शिवसेनेला २८ जागा हव्या असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेला पनवेल पंचायत समिती तसेच पनवेलमधून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. या निवडणुकीत पक्षाचा दारु ण पराभव झाला होता. ही बाब पनवेलमधील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांच्या मनात सलत आहे. त्यामुळे ते भाजपासोबत युती करण्यासाठी आग्रही असल्याचे समजते. महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात शिवसेनेचे प्राबल्य कमी असून शहरी भागात शिवसेनेला मानणारा वेगळा गट आहे. त्यामुळे शिवसेनेला शहरात आपला प्रभाव पाडता येऊ शकतो. मात्र शिवसेनेची भाजपासोबत युती झाली तर युतीचा फायदा होईल, मात्र शिवसेना स्वबळावर लढली तर शेकाप आघाडीला यश मिळू शकते असा अंदाज बांधला जात आहे.त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यापासून पनवेल परिसरात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
शिवसेनेचा निर्णय लवकरच!
By admin | Published: April 26, 2017 12:32 AM