विश्वनाथ पाटील यांना गळाला लावण्यासाठी शिवसेनेची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:44 AM2019-04-04T01:44:45+5:302019-04-04T01:45:01+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मात्र थंडच : शिंदेंनी घडविली ठाकरेंशी रिसॉर्टमध्ये भेट
हितेन नाईक
पालघर : काँग्रेसच्या सर्व पदांचा राजिनामा देणारे काँग्रेसचे नाराज नेते व कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांना गळाला लावण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे. मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी विश्वनाथ पाटील यांच्याशी संपर्क साधला व कुठे आहात असा प्रश्न केला. मी ठाण्याला जातो आहे, असे त्यांनी सांगताच
मीही त्याच रस्त्यावरून जातो आहे.
सायलेंट रिसॉर्टवर चहा घ्यायला या तेवढीच भेट होईल, असे शिंदे म्हणाले त्यामुळे विश्वनाथ पाटील हे त्यांना भेटायला गेले असता गप्पाटप्पा होताच शिंदे म्हणाले, काल दौऱ्यावर असलेले उद्धवजी पलिकडच्याच खोलीत आहेत त्यांना भेटून घ्या. त्यामुळे
पाटील हे त्यांच्या भेटीला गेले असता तुमचा पक्ष, समाज आणि तुम्ही यांचे स्थान आम्ही जाणून आहोत. तुम्ही आम्हाला मदत करा
आम्ही तुमचा आणि तुमच्या समाजाचा मान राखू! असे आवाहन केले. ही भेट इतकी अचानक घडली की काय प्रतिसाद द्यावा असा प्रश्न होता असे पाटील यांनी लोकमतला सांगितले. सोमवारी झालेल्या समाजाच्या बैैठकीत तीन सदस्य समिती नेमली आहे. तिचा निर्णय येईपर्यंत मी काहीही ठरवू शकणार नाही असेही ते म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे, सांदीपन यांचा दूरध्वनी
वसंत भोईर
वाडा : कुणबी सेनेचे सेनापती व जेष्ठ काँग्रेस नेते विश्वनाथ पाटील यांची लोकमतमध्ये मुलाखत प्रसिध्द होताच राजकारणात व काँग्रेस पक्षात खळबळ माजली काँग्रेसचे महाराष्ट्राचे पक्ष प्रभारी मल्लीकार्जुन खरगे यांनी व केंद्रीय काँग्रेस नेते सांदीपन यांनी विश्वनाथ पाटील यांना दूरध्वनी करून त्यांना काँग्रेसमध्येच राहण्याचे आवाहन केले. मी पक्षाच्या पदांचे राजीनामे दिले आहेत, पक्ष सोडलेला नाही. असे उत्तर विश्वनाथ पाटील यांनी दिले तर आम्ही आपले आणि आपल्या समाजाचे महत्व जाणून आहोत आम्ही आपला योग्य तो मान राखू असे खरगे यांनी सांगितले.