नवी मुंबई : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना मुख्यमंत्र्यांनी वडार समाज समन्वय समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त करून राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. यामुळे शिवसेनेत नाराज असलेले चौगुले समर्थकांसह भाजपात जाणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे.
सोलापूरमध्ये ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संस्थेच्यावतीने १७ डिसेंबरला राज्यव्यापी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शविली. वडार समाज समन्वय समितीची घोषणा करण्यात आली. समितीच्या प्रमुखपदी विजय चौगुले यांची नियुक्ती केली व समाजाच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद केली. राज्यात वडार समाजाची लोकसंख्या ५० लाखपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे.
सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नंदूरबार, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, सातारा, लातूर जिल्ह्यात समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. राज्यातील वडार समाजाची मते भाजपाच्या पारड्यात पडावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही खेळी खेळली आहे. समन्वय समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्यामुळे शिवसेनेत नाराज असलेले चौगुले निवडणुकांपूर्वी भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेनेचे नवी मुंबईमधील जवळपास १५ नगरसेवक घेऊन ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष व तळवली गावचे रहिवासी रमेश पाटील यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली. राज्यातील १८ लोकसभा व ७२ विधानसभा मतदार संघामध्ये कोळी समाजाचे मतदान लक्षणीय आहे. महासंघाच्या प्रमुखास विधानपरिषदेची संधी दिल्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोळी महासंघाची मते भाजपाला मिळतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस व राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र पाटील यांनाही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद दिले आहे. माथाडी कामगारांची नवी मुंबई, पनवेल, सातारा, पुणे, सांगली, सोलापूरमधील अनेक मतदार संघामध्ये निर्णायक मते आहेत.नवी मुंबईत भाजपाचे पारडे होणार जडरमेश पाटील, नरेंद्र पाटील यांच्यानंतर विजय चौगुलेंवर पदांचा वर्षाव करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोळी समाज, माथाडी कामगार व वडार समाजाची मते भाजपाकडे वळविण्याची खेळी खेळली आहे. चौगुले व नरेंद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यास, त्यामुळे नवी मुंबईतही भाजपाचे पारडे जड होणार आहे.