कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त बजरंग दलाच्या कोकण प्रांताच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेचे शुक्रवारी नवी मुंबईत आगमन झाले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
आमदार गणेश नाईक, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीयमंत्री गोविंदराव शेंडे, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत, भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख सतीश निकम, यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग ते मुंबई अशी ही यात्रा निघाली असून त्याचा समारोप दादर येथे होणार आहे. शिवशौर्य यात्रेच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये महाराजांच्या जाज्वल्य शौर्याच्या इतिहासाला उजाळा मिळणार आहे, असे मत आमदार गणेश नाईक यांनी यावेळी मांडले. क्षेत्रीय मंत्री शेंडे यांनी अधिक माहिती देताना अशा प्रकारच्या २५९ यात्रा संपूर्ण देशामध्ये काढण्यात आल्याचे सांगितले.
१५ऑक्टोबर २०२३ रोजी दादर येथील शिवाजी मैदानात कोकण प्रांताच्या शिवशौर्य यात्रेचा समारोप होणार असून यावेळी होणाऱ्या सभेला विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन संबोधित करणार आहेत.