कोरोना वाढल्याने नवी मुंबई, पनवेलची शिवमंदिरे राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 02:04 AM2021-03-11T02:04:00+5:302021-03-11T02:04:13+5:30
तर, पनवेलमधील बहुतांशी शिवमंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय तेथील मंदिर ट्रस्टनी घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई / पनवेल : नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, महाशिवरात्रीनिमित्ताने दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी शिवशंभो ट्रस्ट नेरूळगाव सेक्टर १८ ए येथील शिवमंदिर बंद ठेवण्याचा तसेच या वर्षीचा महाशिवरात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. भाविकांनी या दिवशी घरीच राहून शिवमंदिरातील शिवलिंगाचे मनोमन दर्शन घ्यावे तसेच शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
तर, पनवेलमधील बहुतांशी शिवमंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय तेथील मंदिर ट्रस्टनी घेतला आहे. पनवेलमध्ये खांदेश्वर, खारघर शहरातील देवाळेश्वर, कोपरा गावातील शिवमंदिर ट्रस्टनी या वर्षी भाविकांना मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील काही मंदिरे भाविकांना खुली राहणार असली तरी कोविड नियमांचे पालन करून दर्शन घ्यावे, असे आवाहन केले आहे.