शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे, पनवेल महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 02:27 AM2017-10-25T02:27:57+5:302017-10-25T02:28:00+5:30
पनवेल शहर महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. विशेष म्हणजे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची विशेष ओळख आहे.
पनवेल : पनवेल शहर महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. विशेष म्हणजे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची विशेष ओळख आहे. या रायगडाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी लक्षवेधीद्वारे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे. मात्र, ही लक्षवेधी महासभेत विचारात घेतली नसल्याने म्हात्रे यांनी आयुक्त डॉ. शिंदे यांना सोमवारी पत्र देऊन यासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे.
पनवेल शहरात महाराजांचा अश्वारूढ पुतळा सध्याच्या घडीला दिमाखात उभा आहे. शहरातील वाहतूक शाखेच्या चौकीलगत शिवाजी चौकात हा अश्वारूढ पुतळा १९८६-८७ साली उभारण्यात आला आहे. मात्र, संबंधित ठिकाणाबाबत कोणतेही सूचना फलक या परिसरात लावण्यात आलेले नाहीत. पनवेल शहर हे ऐतिहासिक शहर आहे. यासंदर्भात ठिकठिकाणी तशा प्रकारच्या नोंदी सापडतात. मात्र, अशा वेळी राज्याचे वैभव असलेल्या महाराजांच्या स्मारकाबाबत प्रशासनाची उदासीनता आजवर दिसून आली आहे. या ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आले नाहीत. स्मारकाची योग्य पद्धतीने देखरेख केली नसल्याने या परिसरात घुशी आणि उंदरांचा वावर वाढत चालला आहे. या उद्यानातील फांद्यांची छाटणीही वेळेवर केली जात नसल्याने कोणत्याही क्षणी या ठिकाणची झाडे उन्मळून महाराजांच्या पुतळ्यावरही पडू शकतात. या गंभीर विषयाबाबत नुकत्याच पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडून देखील ती विचारात न घेतल्यामुळे प्रशासनाला महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात गांभीर्य नसल्यामुळेच ही महत्त्वाची लक्षवेधी विचारात घेतली नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी या वेळी केला.
आयुक्तांची भेट घेऊन पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला. सुशोभीकरणासंदर्भात नवीन कलाकृती (डिझाइन) सादर करण्यात आली. या वेळी छत्रपतींचा जीवनपट उलगडणारे चित्र, विद्युत रोषणाई, रायगड जिल्ह्याची प्रतिकृती साकारणारी पाहिजे, आबालवृद्धांसाठी वाचनालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय या ठिकाणी उभारावे, अशा प्रकारचा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर केला. टपालनाका परिसरातील महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचेही सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.