नवी मुंबई - काम करण्याची आत्मीयता असल्याने प्रदीर्घ आजारानंतरही खचून न जाता, प्रचंड इच्छाशक्ती असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. देशमुख यांना आदरांजली वाहण्यासाठी शिराळा, वाळवा विकास संघटना मुंबई यांच्या वतीने रविवार, ३ फेब्रुवारी रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात स्मरणसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशमुख यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.देशमुख यांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी सत्यजित देशमुख यांना जबाबदारी देण्याची भावना या वेळी नेत्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली, त्यावर चव्हाण यांनीही या भावनेला दुजोरा दिला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी देशमुख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, त्यांचा विकास कसा होईल यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे सांगत एक चांगला नेता हरपल्याचे दु:ख व्यक्त केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, देशमुख यांनी फक्त मतदार संघाला नाही तर देशाला गवसणी घातली आहे. पक्षात निष्ठा आणि विश्वास किती आणि कसा असावा याचे उदाहरण म्हणजे देशमुख असल्याचे मत व्यक्त केले. राजकारणात अनेक आघात होऊनही त्यांचा कधी तोल गेला नसल्याचे सांगत देशमुख यांनी राजकारणात जे वलय निर्माण केले होते तेच वलय सत्यजित देशमुख निर्माण करतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.माजी मंत्री गणेश नाईक यांनी मोठ्या पदावर अनेक नेते होऊन गेले; परंतु गोरगरिबांसाठी झटून त्यांना मदत करण्याची धारणा असलेला नेता गेल्याने संपूर्ण राज्याचे नुकसान झाल्याचे सांगत देशमुख यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी सत्यजित यांना जबाबदारी द्यावी ही खरी श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय स्मरणसभेला विविध पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावत देशमुख यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांचे कथन करून आदरांजली वाहिली. या कार्यक्र माला सत्यजित देशमुख, आमदार जोगेंद्र कवाडे, आ. अमित देशमुख, आ. किरण पावसकर, आ. निरंजन डावखरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, माजी आ. रमेश शेडगे, नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक आदी मान्यवर संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजीराव देशमुख म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्त्व , माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 4:34 AM