- वैभव गायकर
पनवेल: ग्रामपंचायती हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावुन त्यापासुन खत निर्मिती करण्याचा उपक्रम शिवकर ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे. नववर्षांच्या मुहूर्तावर हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अशाप्रकारचा उपक्रम राबविणारी शिवकर हि जिल्ह्यातील पाहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणुन नुकताच या ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त झाला आहे. 800 पेक्षा जास्त ग्रामपंचायती मधुन शिवकर ग्रामपंचायत सरस ठरली आहे.ग्रामपंचायतीने राबविलेले उपक्रम हे कौतुकास्पद आहेत.आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातुन येथील सरपंच अनील ढवळे हे चर्चेत असतात.पुन्हा एकदा ढवळे यांनी ग्रामपंचायती मार्फत घनकचरा व्यवस्थापन हा उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमांअंतर्गत ओला व सुका कचरा वेगवेगळा करून त्यापासून सेंद्रियखत तयार केले जाणार आहे. याकरिता सहा लाखांचा खर्च करण्यात आला आहे.याकरिता दोन कचरा कुंड्या ,प्लास्टिक क्रशर मशीन ,खतनिर्मिती मशीन ,पत्रा शेड,पाण्याची व्यवस्था आदी उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत.
चार महिन्यात प्रक्रिया केलेल्या कचऱ्यातुन सेंद्रिय खत निर्मिती होणार आहे.या खताची ग्रामपंचायत विक्री करणार असल्याची माहिती सरपंच ढवळे यांनी दिली.हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यासाठी रोल मॉडेल असेल असे ढवळे यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत हा उपक्रम राबवित असताना ग्रामपंचायतीला प्रत्येकी महिन्याला 10 ते 12 हजारांचा खर्च आहे.हा खर्च कचर्यातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताच्या विक्रीनंतर वसुल होणार आहे.
इतर ग्रामपंचायती समोर आदर्श
पनवेल तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे.अनेक गावांचे शहरात रूपांतर होत असताना ग्रामपंचायती कडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा नाही आहे.अनेक ग्रामपंचायती कचरा रस्त्याच्या कडेला फेकुन त्याला आग लावत आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.विशेष म्हणजे तालुक्यात शिवकर ग्रामपंचायती पेक्षा अनेक पटीने श्रीमंत असलेल्या ग्रामपंचायती देखील कचऱ्याच्या योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीच यंत्रणा राबवत नाही.अशा ग्रामपंचायती समोर शिवकर ग्रामपंचायतीने या उपक्रमाच्या माधमातून एक आदर्श निर्माण करून दिला आहे.