शिवनेरी हापूसला हवे भौगोलिक मानांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:22 AM2022-05-26T10:22:55+5:302022-05-26T10:23:34+5:30
शासनस्तरावरही पाठपुरावा : राष्ट्रवादीच्या अध्यक्षांसह उपमुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंबा शिवनेरी हापूस म्हणून ओळखला जातो. कोकणच्या हापूसप्रमाणे या आंब्यालाही स्वतंत्र भौगोलिक मानांकन (जीआय) मिळावे यासाठी उत्पादक व शेतकरी संघटनांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी एक वर्षापूर्वीच सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. जीआय मानांकनाच्या पाठपुराव्यासाठी शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली.
कोकणच्या हापूस प्रमाणे जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंब्याचेही वेगळे वैशिष्ट्य आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात या आंब्याचा हंगाम सुरू होतो. आंबा उत्पादनाला जवळपास ४०० वर्षांची परंपरा असून सद्यस्थितीमध्ये जवळपास एक हजार एकरवर आंबा लागवड सुरू आहे. या आंब्याला स्वतंत्र भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी हापूसवर संशाेधन करून जीआय मानांकनासाठी जीआय मानांकन कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनीही यासाठी सहकार्य केले आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमाधून यापूर्वी निधीही उपलब्ध करून दिला होता.
५ जूनपासून हंगामाला प्रारंभ
यावर्षी शिवनेरी हापूसचा हंगाम ५ जूनपासून सुरू होणार आहे.
मुंबई बाजार समितीचे संचालक संजय पानसरे, आंबा उत्पादक व महानंदाचे कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली.
जीआय मानांकन लवकर प्राप्त व्हावे यासाठी पाठपुरावा करण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली.