नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने नवी मुंबईमधील परिसर दुमदुमला. प्रत्येक विभागामध्ये विविध सामाजिक संस्थांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होेते. रक्तदान शिबिर, कोरोनाविषयी जनजागृती करून शिवभक्तांनी सामाजिक बांधिलकी जपली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले होते. प्रत्येक नोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नेरूळ सेक्टर १८ मध्ये शिवशंभो रिक्षा स्टँड येथे रिक्षाचालक प्रत्येक वर्षी शिवजयंतीचे आयोजन करतात. यावर्षीही शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असा संकल्प रिक्षाचालकांनी केला. नेरूळ सेक्टर २५ मधील पंचरत्न सोसायटीच्या परिसरात शिवजयंतीचे आयोजन केले हाेते. यावेळी सामाजिक भान राखून रक्तदान शिबिर घेण्यात आले. सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर डी. आर. पाटील रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीनेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तुर्भे नाका येथे नाका कामगारांन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेनेच्या कामगार विभागाचे उपशहरप्रमुख प्रदीप वाघमारे, संतोश बंडगर, अविराज शिंदे, विजय गायकवाड व इतर पदाधिकरी उपस्थित होते. जुईनगर सेक्टर २४, नेरूळ सेक्टर २, वाशी,कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली परिसरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचालित ऐरोली सेक्टर- २ येथील ज्ञानदीप विद्यामंदिर, शेलार येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षकांनी शिवरायांच्या घोषणा, पाळणा व इतर स्फूर्तिगीते गायिली.कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, सोशल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.
पालिका प्रशासनास सहकार्यकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले होते. नवी मुंबईमधील बहुतांश मंडळांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. मोठ्या मिरवणुका व ढोल-ताशांचा गजर न करता साधेपणाने साजरा केला.