सूर्यकांत वाघमारेलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेत बचावकार्यासाठी जाताना नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाचे अधिकारी शिवराम ढुमणे यांचा मृत्यू झाला. इर्शाळगडापूर्वीचा डोंगर चढत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. इर्शाळवाडीलगतच त्यांच्या मावशीचे गाव असल्याने परिसराबद्दल त्यांना इत्थंभूत माहिती होती. यामुळे इतर सहकाऱ्यांची काळजी घेऊन ते सर्वांना घटनास्थळाकडे घेऊन जात असतानाच त्यांच्यासोबत हा प्रसंग घडला.
मोरबे धरणालगत असलेल्या इर्शाळवाडीवर डोंगराचा मोठा भाग बुधवारी रात्री कोसळला. त्यात वाडीतली निम्म्याहून अधिक घरे मातीखाली गाडली गेली. अनेक जण त्यात अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी सर्वच ठिकाणावरून बचाव पथके घटनास्थळाकडे धाव घेत होती. त्यात नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या सर्वच केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तुकडीदेखील घटनास्थळाकडे गेली. त्यात सीबीडी अग्निशमन केंद्राचे सहायक अधिकारी शिवराम ढुमणे (वय ४८) हेदेखील होते. मावशी राहत असल्याने परिसरात ढुमणे यांचे तेथे सातत्याने येणे-जाणे होते. तिथल्या पायवाटा माहिती असल्याने व मुसळधार पाऊस असल्याने काय खबरदारी घेतली पाहिजे, याबाबत ते सर्वांना मार्गदर्शन करत होते. मात्र, डोंगराचा पहिला टप्पा ओलांडल्यानंतर काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांना पुन्हा खाली आणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांना मृत्यूने गाठले.
मधुमेहाचा होता आजारमधुमेहाचा (लो शुगर) त्रास असल्याने यापूर्वी अनेकदा बचावकार्यादरम्यान त्यांना चक्कर आली होती; परंतु सहकाऱ्यांकडून त्यांना वेळीच मदत मिळत होती. इर्शाळगडाकडे जात असतानादेखील हृदयविकाराच्या झटक्याच्या काही वेळ अगोदर त्यांना चक्कर आली. तेव्हा सोबतच्या सहकाऱ्यांनी त्यांना आधार दिला होता, असे समजते. यामुळे सहकाऱ्यांची काळजी घेऊन मृत्यूच्या दाढेत गेलेल्या ढुमणे यांच्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.