आधी ठाणे आता नवी मुंबई; ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार?; ठाकरेंच्या अडचणीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 04:18 PM2022-07-07T16:18:49+5:302022-07-07T16:24:45+5:30
ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाला आणखी एक मोठा झटका दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. गुरूवारी या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते.
शिवसेनेला मोठं खिंडार! ठाण्यात तब्बल ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट#EknathShindepic.twitter.com/b9gM7W5pRg
— Lokmat (@lokmat) July 7, 2022
ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर शिवसेनेचे ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शिवसेनेसाठी हा आणखी मोठा धक्का आहे.
ठाण्यातील नगरसेवकांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. कारण मागील २५ वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. मात्र, ठाण्यातील एक दिग्गज नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या या खेळीमुळे शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेची वाटचाल अतिशय खडतर असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या ६६ नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर अद्याप शिवसेनेकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही.
शिवसेनेच्या अडचणीत वाढ
मोठ्या कालावधीपासून ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचे एकतर्फी वर्चस्व राहिले आहे. शिंदे प्रदीर्घ काळ ठाण्यात सेनेचे प्रभारी होते. मात्र त्यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेची आगामी वाटचाल कशी असेल अशी अटकळ बांधली जात आहे. अवघ्या काही महिन्यांतच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे, त्यामुळे आगामी निवडणुकींना शिवसेना कशी सामोरे जाते हे पाहण्याजोगे असेल.