महाड : तालुक्यातील विन्हेरे जिल्हा परिषद गटातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे यांची पत्नी निकीता ताठरे यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला असला तरी या गटातून शिवसेनेचे प्रबळ दावेदार असलेल्या माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्या स्रुषा वृषाली मोरे यांनी देखील शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याने शिवसेनेत पेच निर्माण झाला आहे. या दोन उमेदवारांपैक ी शिवसेना कोणाला अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब करते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिरवाडी गटातून देखील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बिरवाडीचे सरपंच माधव बागडे यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने शिवसेनेची डोके दुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. या गटात बागडे यांच्याऐवजी संजय कचरे यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेसकडून सोमवारी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. तर रविवारी वहूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रेहान देशमुख व वरंध गटातून माजी पं.स. सभापती मनाली गुरव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.महाड तालुक्यात ५ जिल्हा परिषद गटासाठी १५ तर पंचायत गणाच्या १० जागांसाठी १७ उमेदवारांनी रविवारपर्यंत अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयात देण्यात आली. काँग्रेस उमेदवारांची अद्यापही घोषणा नाही.
महाडमध्ये शिवसेनेत निर्माण झाला पेच !
By admin | Published: February 06, 2017 4:53 AM