लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. शिवसेनेने पनवेल महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून, यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ त्यांना लाभली आहे. गुरुवारी रात्री खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्यांच्या वतीने याबाबत घोषणा करण्यात आली. कळंबोली, कामोठेसारख्या शहरात स्थलांतरित शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पनवेलचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेनेसोबत जात असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र खोत यांनी या वेळी दिली. शिवसेनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारांची यादी निश्चित होण्याची अपेक्षा असताना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत युती एवढ्याच विषयावर या वेळी चर्चा झाली. खारघर येथील सेनेचे उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे वेळी सेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आदेश बांदेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, दीपक निकम, वासुदेव घरत, खारघर शहरप्रमुख गुरु नाथ पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘साथ साथ’
By admin | Published: May 06, 2017 6:24 AM