नवी मुंबई - शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ठाकरे' सिनेमा बॉक्सऑफिसवर आज झळकला आहे. रिलीजनंतरही ठाकरे सिनेमावरुन काही-न्-काही वाद सुरूच आहेत. सिनेमा पाहण्यासाठी शिवसैनिकांसहीत सिनेरसिकांनीही पहाटेच सिनेमागृहांमध्ये गर्दी केली होती. पण वाशी येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ सिनेमाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांनी येथे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसंच जोपर्यंत सिनेमाचे पोस्टर लावले जात नाही तोपर्यंत थिएटरमध्ये ठिय्या मांडून बसणार, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता.
वाशीच्या आयनॉक्समध्ये सकाळी 8 वाजता ‘ठाकरे’ सिनेमाचा खेळ होता. सिनेमा पाहण्यासाठी नवी मुंबईतील शिवसैनिक येथे पोहोचले. पण, सिनेमागृहाबाहेर 'ठाकरे'चं एकही पोस्टर न दिसल्यानं शिवसैनिक संतापले आणि त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. दरम्यान, अर्ध्या तासात हे पोस्टर लावण्यात येतील, असे आश्वासन थिएटर मालकाकडून मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी बंद केली.
दरम्यान, ठाकरे सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा मराठी आणि हिंदी भाषेत रिलीज बॉक्सऑफिसवर झळकला आहे. संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमाची पटकथा लिहिली असून यासाठी त्यांना चार वर्षे लागली.