नवी मुंबई : कळंबोलीमधील सिलिंडर दुर्घटनेमध्ये दोन कुटुंबातील चार जण जखमी झाले असून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या कुटुंबीयांना नवी मुंबई शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. नगरसेवक किशोर पाटकर यांनी दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केली आहे.येथील सेक्टर ३ मधील एलआयजी वसाहतीमध्ये गुरूवारी पहाटे सिलिंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये सोहम कट्टे या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून नाना जाधव, अश्विनी जाधव, शुभांगी कट्टे व बबन कट्टे हे चार जखमी झाले आहेत. जखमींपैकी अश्विनी या ६० टक्के व नाना हे २० टक्के भाजले आहेत. त्यांना प्रथम कळंबोली एमजीएम रूग्णालयात व नंतर ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सोहम कट्टेच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबीयांचे प्रचंड नुकसान झाले असून मानसिक धक्काही बसला आहे. तुर्भेमधील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या नाना जाधव व त्यांच्या पत्नीवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. उपचारासाठी दीड लाख रूपये अनामत रक्कम भरावी लागली आहे.‘लोकमत’ने या घटनेचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून मदतीचेआवाहन केले होते. नवी मुंबईमधील शिवसेना नगरसेवक किशोरपाटकर यांनी तत्काळ दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली. दुर्घटनेमध्ये झालेल्या नुकसानीचे व जखमींची चौकशी केली. जाधव पती - पत्नी भाजल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलाचा मृत्यू झाल्याने कट्टे कुटुंबीयांना धक्का बसला असल्याचे शेजाºयांनी सांगितले. दोन्ही कुटुंबीयांना सहकार्य म्हणून दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मदतीमुळे उपचारासाठी मोठी मदत झाली असल्याची प्रतिक्रिया जाधव कुटुंबीयांनी दिली आहे.
सिलिंडर दुर्घटनाग्रस्तांना शिवसेनेची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 3:06 AM