जुईनगरमध्ये दफनभूमीविरोधात शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम
By admin | Published: June 22, 2017 12:28 AM2017-06-22T00:28:30+5:302017-06-22T00:28:30+5:30
जुईनगर सेक्टर २ मध्ये शाळा व बैठ्या चाळींच्या समोरील भूखंड गोसावी व लिंगायत समाजाला दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २ मध्ये शाळा व बैठ्या चाळींच्या समोरील भूखंड गोसावी व लिंगायत समाजाला दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. नागरी वस्तीमध्ये दफनभूमीला शिवसेनेने विरोध केला असून बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
शाळा व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या वसाहतीच्या समोरच हा भूखंड आहे. यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दफनभूमीला जागा मिळालीच पाहिले, परंतु ती नागरी वसाहतीमध्ये नसावी. नागरी वसाहतीमध्ये व शाळेच्या समोरच हा भूखंड असल्याने भविष्यात गंभीर स्थिती होण्याची शक्यता आहे. यामुळे रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बुधवारी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो रहिवासी व पालकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होवून विरोध दर्शविला. सह्यांचे निवेदन महापालिका आयुक्त व सिडको प्रशासनाला देण्यात येणार आहे. लोकभावना लक्षात घेवून या भूखंडाचे वाटप रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.
स्वाक्षरी मोहिमेमध्ये औटी यांच्यासोबत नगरसेवक विशाल ससाणे, विभाग प्रमुख गणेश घाग, मनोज चव्हाण, राजेश पुजारी उपस्थित होते. रहिवाशांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांची दखल प्रशासनाने घेतली नाही तर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.