पनवेल : उलवा नोडमध्ये नव्याने झालेल्या खारकोपर रेल्वे स्टेशनजवळ, कोपर फाटा येथे सिडकोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टी उभारण्यासाठी एक एकर जमिनीचे नियोजन करण्यात आले आहे. सिडकोचे मुख्य अभियंता के.के. वरखेडकर यांनी बुधवारी लोकप्रतिनिधींसह उलवे नोडची पाहणी केली.
उलवा नोडमध्ये मध्यवर्ती असलेल्या खारकोपर येथील रेल्वे स्टेशनजवळील परिसरात सिडको महामंडळाच्या वतीने शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सिडकोकडे केली होती. श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीमार्फत माजी खासदार दि. बा. पाटील व तत्कालीन पनवेल पंचायत समितीचे सभापती जनार्दन आत्माराम भगत यांच्या नेतृत्वाखाली कोपरफाटा-गव्हाण येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी मे १९८१ साली करण्यात आली होती. सभोवताली महाराष्ट्र नकाशाच्या रूपात संरक्षक भिंत उभारणी करण्यात आली होती. या पुतळ्याच्या उभारणीस आजमितीस सुमारे ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच धर्तीवर उलवा नोडमध्ये भव्य स्वरूपात शिवसृष्टी उभारल्यास बहुभाषिक रहिवाशांना त्याची ओळख पटणार आहे. मुंबई येथील चेंबूर या ठिकाणी तसेच नवी मुंबईतील वाशी, सेक्टर ९ मधील विष्णुदास भावे नाट्यगृहाशेजारी उभारलेल्या पुतळ्याप्रमाणे हा पुतळा उलवे नोडच्या मध्यवर्ती असलेल्या खारकोपर येथील रेल्वे स्टेशनजवळील परिसरात सिडको महामंडळाच्या वतीने उभारावा, अशी मागणी रामशेठ ठाकूर यांनी सिडकोकडे केली होती. त्या अनुषंगाने या जागेची पाहणी केली.
या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, सिडकोचे अधीक्षक अभियंता केशव वरखेडकर, रमेश गिरी, रामवड, तसेच वसंत पाटील आदी उपस्थित होते.