पनवेलमध्ये मिळणार शिवथाळी; अकरा अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:52 AM2020-01-04T00:52:17+5:302020-01-04T00:52:22+5:30
तहसीलदारामार्फत जागेची चाचपणी
पनवेल : शिवथाळी योजना पनवेलमध्येही सुरू होणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आणि महापालिका क्षेत्रात शिवथाळी सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
गरीब आणि गरजूंना सवलतीच्या दरात जेवण मिळावे, म्हणून शिवसेनेने निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती. आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात सरकारने शिवथाळी सुरू करण्याच्या ठिकाणांची घोषणा केली, यानुसार पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी याकरिता जागेची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तहसीलदारांकडे ११ अर्ज दाखल झाले आहेत.
शासनाने काढलेल्या जीआरनुसार, ही योजना अमलात येणार आहे. तहसीलदारासह महापालिका आयुक्तही शिवथाळी योजनेसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीवर असणार आहेत. दहा रुपये किमतीच्या शिवथाळीला सरकारकडून ४० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
पनवेलमध्ये ३५० शिवथाळींना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. इच्छुकांनी अर्ज सादर केल्यामुळे पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सानप यांनी सांगितले.