नवी मुंबई : ऐन उत्सव काळात महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका नवी मुंबईकरांना बसला आहे. सप्टेंबर महिन्याची वाढीव देयके पाठविण्यात आल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ही देयके गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळपास दुप्पटीने अधिक आहेत. त्यामुळे महावितरणच्या कारभाराच्या विरोधात शहरवासियांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात शहरवासियांना अनेकदा आंदोलने करावी लागली आहेत. वाढीव विद्युत बिले, विद्युत कर्मचाऱ्यांची आरेरावी, वीजेचा लंपडाव आदी प्रकारामुळे रहिवासी अगोदरच संतापले आहेत. आता यात वाढीव बिलाची भर पडली आहे. ग्राहकांना सप्टेंबर महिन्याची भरमसाठ देयके पाठविण्यात आली आहेत. देयकाची ही रकम आॅगस्ट महिन्याच्या देयकापेक्षा जवळपास दुप्पट आहे. शहरातील बहुतांशी ग्राहकांना अशाच प्रकारे वाढीव देयके पाठविले आहेत. अनेकदा विद्युत मीटरची रिडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनमानीचा फटका ग्राहकांना बसतो. हे कर्मचारी वाटेल तेव्हा रिडिंग घ्यायला येतात. रिडिंग घेण्याचा कालावधी महावितरणने अगोदरच निश्चित केलेला असतो. त्यामुळे या कालावधीतच मीटरचे रिडिंग घेणे अपेक्षित असते. परंतु हे कर्मचारी अनेकदा महिन्याच्या शेवटी रिडिंग घेतात. तोपर्यंत सरासरी वापरापेक्षा युनिट वाढलेले असते. त्याप्रमाणे देयकाची रकमही वाढत असल्याने त्याचा थेट फटका ग्राहकाला बसत आहे. सप्टेंबर महिन्याच्या देयकांतही हाच गोंधळ झाल्याची चर्चा असून यासंदर्भात महावितरणने कडक भूमिका घेण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.वीजेच्या घरगुती वापरासाठी 0 ते १00 युनिटपर्यंत प्रति युनिटला ३.७६ पैसे विद्युत शुल्क आकारले जाते. तर १0१ ते ३00 युनिटपर्यंत हा दर प्रति युनिट ७.२१ रूपये इतका आहे. ३0१ ते ५00 आणि ५0१ ते १000 युनिटपर्यंतच्या वीज वापराला प्रति युनिटला अनुक्रमे ९.९५ आणि ११.३१ रूपये आकारले जातात. महिन्याचे विद्युत मीटर रिडिंग उशिराने घेतल्यास सरासराी युनिटमध्ये आपोआपच वाढ दर्शविली जाते. ही वाढ नैसर्गिक असली तरी युनिटच्या टेरिफप्रमाणे बिलाची आकारणी केली जात असल्याने त्याचा फटका ग्राहकाला बसतो.विद्युत देयकांवर वीज वापाराचे रिडिंग दर्शविणाऱ्या विद्युत मीटरचे छायाचित्रे टाकले जाते. त्यानुसार विद्युत बिलाची आकारणी केली जाते. परंतु सप्टेंबर महिन्याच्या अनेक विद्युत बिलावर छापण्यात आलेले रिडिंग दर्शविणारे विद्युत मीटरचे छायाचित्र अत्यंत अस्पष्ट आहे. त्यामुळे आपण नक्की किती युनिट वीजेचा वापर केला याचा ग्राहकांना बोध होत नाही. यापार्श्वभूमीवर सदर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.वाढीव विद्युत देयके आल्यासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारी आलेल्या नाहीत. परंतु एखाद्याला वाढीव देयक आले असेल तर त्याची नक्कीच चौकशी करून कार्यवाही केली जाईल. - गफ्फर खान, कार्यकारी अभियंता, महावितरण
शहरवासीयांना वाढीव बिलाचा शॉक
By admin | Published: October 02, 2016 3:03 AM