नवी मुंबई : गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक तथा स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल होणार यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाला आहे. तुर्भे येथे आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांची मांदियाळी दिसून आली. यावरून कुलकर्णी यांच्या शिवसेना प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मागील २५ वर्षे महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. या वेळी सत्तांतर करण्याच्या दृष्टीने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचा निर्धार केला आहे.
नाईकांची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडीकडून व्यूहरचना केली जात आहे. नाईक गटातील दहा ते १५ नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा रंगत आहे. तुर्भे स्टोअर येथे शुक्रवारी पार पडलेल्या हळदीकुंकू समारंभातून या चर्चेच्या सत्यतेवर काही प्रमाणात शिक्कामोर्तब झाले.
सुरेश कुलकर्णी यांचे सुपुत्र महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रेरणा व स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने रविवारी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, शहरप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, विजय माने, तसेच स्वत: सुरेश कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. समारंभाच्या माध्यमातून सुरेश कुलकर्णी यांनी प्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे.
सुरेश कुलकर्णी यांचा तुर्भे परिसरात प्रभाव आहे. त्यामुळे या परिसरातील चार समर्थक नगरसेवकांसह ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. शुक्रवारच्या कार्यक्रमानंतर कुलकर्णी यांच्यासह तुर्भे विभागातील नगरसेवकांच्या शिवसेनाप्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याचे बोलले जात आहे.