भुयारीमार्गात खेळताना शॉक लागून मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:21 AM2019-06-06T01:21:56+5:302019-06-06T01:22:04+5:30
घणसोलीतील प्रकार : भुयारातील पाणी उपसण्यासाठी बसवलेत पंप
नवी मुंबई : भुयारीमार्गात साचणारे पाणी उपसण्यासाठी बसवण्यात आलेल्या विजेच्या मोटरच्या वायरचा शॉक लागून मुलाच्या मृत्यूची घटना घणसोलीत घडली आहे. क्रिकेट खेळताना त्या ठिकाणी गेलेला चेंडू घेण्यासाठी सदर मुलगा त्या ठिकाणी गेला असता हा प्रकार घडल्याचे समजते. मात्र, सदर जागा बंदिस्त केलेली असतानाही गर्दुल्ल्यांनी दारूच्या बाटल्या लपवण्यासाठी तिथला लॉक तोडल्याचा प्रशासनाचा आरोप आहे.
शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांच्या भुयारीमार्गांचे नियोजन चुकल्याने असे भुयारीमार्ग पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, अनेक पादचारी भुयारीमार्ग वापराविना पडून आहेत. त्यामध्ये तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली तसेच रबाळे रेल्वेस्थानकालगतच्या भुयारीमार्गांचा समावेश आहे. तर ज्या भुयारीमार्गांचा काही प्रमाणात वापर केला जातो, अशा ठिकाणच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. मात्र, त्या ठिकाणी सुरक्षेची कसलीही काळजी घेतली जात नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारातून घणसोली रेल्वेस्थानकालगतच्या भुयारीमार्गाच्या ठिकाणी विजेचा शॉक लागून आमन मंजुर खान (११) याचा मृत्यू झाला आहे.
लगतच्याच परिसरात तो राहणारा असून मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना भुयारातील पाण्यात गेलेला चेंडू घेण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला होता. या वेळी तिथल्या विद्युत वायरीचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीसठाण्यात मृत्यूची नोंद झाल्यानंतर पुढील तपासाकरिता पोलिसांनी पालिकेकडे माहिती मागवली आहे. त्यानुसार घणसोली विभाग कार्यालयामार्फत घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. मात्र, सदर भुयारीमार्गातील पाणी उपसण्यासाठी मोटर बसवलेली जागा लॉक लावून बंदिस्त करण्यात आलेली असल्याचे विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे यांनी सांगितले; परंतु काही गर्दुल्ल्यांनी तिथले लॉक तोडून आतमध्ये दारूच्या बाटल्या साठवण्याची जागा केल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याशिवाय मोटरच्या वायरीसह इतरही विद्युत वायरी त्या ठिकाणी असल्याने दुर्घटना नेमकी कशामुळे घडली हे तपासले जाणार असल्याचेही नागरे यांनी सांगितले. या घटनेवरून रेल्वेस्थानकांच्या भुयारीमार्गात वापरल्या जाणाऱ्या पंपहाउसपासून पादचाऱ्यांना धोका उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.