Navi Mumbai BJP: नवी मुंबई शहरातील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात विष प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आणि त्यानंतर जाधव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी नगरसेवक असलेले भरत जाधव हे मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटात होते. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगत जाधव यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर ते कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथं जाऊन भरत जाधव यांनी विष प्राशन केलं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. हा प्रकार लक्षात येताच जाधव यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाल्मीक कराडचं नाव घेऊन काय आरोप केला?
भरत जाधव यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत आपली आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. "मी प्रचंड मानसिक तणावात असल्याने हे पाऊल उचलत आहे. समाजामध्ये वाल्मीक कराड याच्यासारख्या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मी प्रामाणिकपणे माझा व्यवयाय करत असतानाही मला त्रास देण्यात आला. माझी कामे बंद पाडण्यात आली," असा आरोप जाधव यांनी केला आहे.