- वैभव गायकर
पनवेल : एकीकडे पालिका प्रशासन कोविड या संसर्ग जंन्य आजारासोबत दोन हात करत असताना पालिका क्षेत्रात गंभीर प्रकार समोर आला आहे.कोविडचे रुग्ण आपली माहिती लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे.याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नाराजी व्यक्त करीत अशाप्रकारे प्रशासनाला अंधारात ठेवणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देशमुख यांनी दिली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकताच पालिका क्षेत्रातील रुग्णांच्या संख्येने तीन हजारांचा आकडा ओलांडला आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासनावर हा साथीचा आजार नियंत्रणात आणण्याची जबाबदारी वाढत असताना पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी काही नागरिक माहिती लपविण्याचा प्रयत्न करताना दिसुन येत आहे. कोविड बाबत अनेक समज ,गैरसमज असल्याने समाजातील आपल्या प्रतिमेपोटी काही नागरिक आपली माहिती लपवत आहे.सॅम्पल टेस्टिंगच्या दरम्यान चुकीचा पत्ता देऊन हि माहिती लपविली जात आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या प्रेस नोट मध्ये केवळ राहता पत्ताच रुग्णांची ओळख म्हणुन दाखविला जात असल्याने चुकीचा पत्ता देण्याचे प्रकार केले जात आहेत. पनवेलमध्ये कोविड च्या रुग्णांना सहजरित्या उपचार मिळतो अशा धारणेने माहिती लपवुन अनेकजण उपचार घेत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.या गंभीर प्रकाराची दखल घेत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पालिका क्षेत्रातील सॅम्पल घेणाऱ्या लॅबना देखील संबंधित रुग्णांचा योग्य पत्ता नोंद केला जाईल याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
पनवेल मध्ये सध्याच्या घडीला एमजीएम रुग्णालय कामोठे ,उपजिल्हा रुग्णालय पनवेल ,इंडिया बुल्स आदी ठिकाणी कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
चुकीचा पत्ता देऊन माहिती लपवणे हा कायद्याने गुन्हा आहे. पॅथॉलॉजी लॅबना देखील आपल्याकडून योग्य माहिती भरली जाईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काही नागरिक आपली माहिती लपवित असल्याचे काही प्रकरणात पहावयास मिळाले आहे. अशा प्रकारे शासनाची फसवणूक केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणार आहोत.
-सुधाकर देशमुख (आयुक्त ,पनवेल महानगरपालिका )