नवी मुंबई - आजारामुळे मृत पावलेल्या तरुणाचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारातुन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. उलवे येथील 29 वर्षीय तरुणाचा हा मृतदेह असून, अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आले असता हा प्रकार उघड झाला. दरम्यान अनेक मृतदेहांमध्ये तरुणाच्या मृतदेहाची आदलाबदल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उलवे येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणाला प्रकृतीच्या कारणावरून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो मूळचा पश्चिम बंगालचा असून उलवेत एकटाच रहायचा. प्रकृतीच्या कारणावरून त्याचा मृत्यू झाल्यानंतर कोरोना चाचणीसाठी मृतदेह 9 मे रोजी वाशीतील पालिका रुग्णालयात पाठवण्यात आला होता. एनआरआय पोलिसांमार्फत पंचनामा करून हा मृतदेह वाशी रुग्णालयात पाठवण्यात आलेला. त्याठिकाणी चाचणी झाल्यानंतर 15 तारखेला त्या मयत तरुणाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना रुग्णालयातर्फे कळवण्यात आले होते. या कालावधीत मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. परंतु मयत भावाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळताच, मयत तरुणाचा भाऊ शनिवारी वाशीतील पालिका रुग्णालयात गेला. त्याने अंत्यविधीसाठी मृतदेहाची मागणी केली. यावेळी मृतदेह शोधण्यास उशीर लागत असल्याचे सुरवातीला सांगण्यात आले. तर रात्रभर वाट पाहिल्यानंतर रविवारी सकाळी त्यांनी पून्हा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी शवागारात असलेले मृतदेह दाखवून देखील त्या मयत तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली नाही. यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाचा थरकाप उडाला आहे.
दरम्यान भावाचा मृतदेह मिळत नसल्याने त्याने वाशी पोलिसांकडे तक्रार केली असता, रुग्णालय प्रशासनाच्या अंतर्गत तपासाचा भाग असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनी चौकशी समितीची स्थापना केली आहे.
त्यांच्याकडून सोमवारी सकाळपासून चौकशीला सुरवात करण्यात आली आहे. 9 मे पासून रुग्णालयात आलेले मृतदेह व संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले मृतदेह यांची माहिती तपासली जात आहे. शिवाय वाशी पोलिसांच्या मदतीने रुग्णालयातील सीसीटीव्ही देखील तपासले जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाचा गलथानपणा असल्याचा आरोप मयत तरुणाच्या भावाकडून होत आहे. तर मृतदेहाची पाठवणूक करताना पोलिसांकडून योग्यरीत्या टॅगिंग झाले नसल्याच्या शकत्येचाही आरोप रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून होत आहे. मात्र या हलगर्जीमुळे सदर तरुणाच्या मृतदेहाची अदलाबदल होऊन तो दुसऱ्या कोणाच्या ताब्यात गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु मृतदेह रुग्णालयात पाठवण्यापर्यंतची जबाबदारी पोलिसांची होती. शिवाय जर कोरोना चाचणी होईपर्यंत मृतदेह रुग्णालयात होता, त्यानंतर तो रुग्णालयातून गहाळ झाला असल्यास रुग्णालय व्यवस्थापनच त्याला जबाबदार असल्याचाही आरोप होत आहे.
शहरातील एखाद्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास कोरोना चाचणीसाठी तो ताब्यात घेतला जात आहे. या चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात आहे. त्यामध्ये साधारण 4/5 दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे शवागारात मृतदेहांची संख्या वाढत आहे. सध्यस्थितीला पालिकेच्या वाशीतील रुग्णालयात 37 मृतदेह आहेत. ते सर्व मृतदेह मयत तरुणाच्या भावाला दाखवण्यात आले आहेत. परंतु त्यामधून मयत तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. यामुळे शवागारातून मृतदेह गहाळ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता तो झाला नाही.
तर मृतदेह गहाळ झाल्याप्रकरणी अद्याप कसलाही गुन्हा दाखल नसून पालिकेचा अंतर्गत तपासाचा भाग असून, त्यांच्या स्पष्टोक्ती नंतर योग्य कारवाई केली जाईल असे परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.