नवी मुंबई - नव-यासोबत शॉपिंगसाठी घराबाहेर पडलेल्या एका 23 वर्षीय महिलेचे नवी मुंबईतून दिवसाढवळया अपहरण करण्यात आले. रविवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. चित्रपटात दाखवतात त्या प्रमाणे फिल्मी स्टाईलने हे अपहरण नाटय घडले. दोघे नवरा-बायको शॉपिंगसाठी इन ऑरबिट मॉलमध्ये गेले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर दोघे रघुलीला मॉलच्या दिशेने निघाले. रस्त्यातून दोघे बोलत चालले असताना एक कार वेगात तिथे आली. त्यातून चौघे उतरले व त्यांनी नव-याला मारहाण सुरु केली.
त्याचवेळी त्यांनी महिलेला खेचून गाडीत बसवले व गाडी सानपाडयाच्या दिशेने निघून गेली असे मोहम्मद इक्बाल मोहम्मद उमर चौधरीने (28) सांगितले. तू आमच्या बहिणीला घेऊन मुंबईला आलास, तिला सोडून दे, आम्ही तिला परत घेऊन चाललो आहोत असे मारहाण करणारे बोलत होते असे पती उमर चौधरीने सांगितले. रेश्मा अशोक कुमार कुनील (23) असे पीडित महिलेचे नाव आहे. उमर चौधरीने वाशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी अपहरणामागे पीडित महिलेच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे. रेश्मा मुळची मंगळुरुची असून तिथून पळून आल्यानंतर तिने मुंबईत येऊन मोहम्मद इक्बाल उमर चौधरी बरोबर विवाह केला. कुटुंबियांच्या इच्छेच्या विरोधात हे लग्न झाल्याने पोलिसांनी महिलेच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे. सातवर्षांपूर्वी रेश्मा आणि मोहम्मद इक्बालची फेसबुकवरुन ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यावर्षी जुलै महिन्यात दोघांनी गुप्तपणे लग्न केले.
चौधरी नवी मुंबई येथील एका कंपनीत सहाय्यक इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे. रेश्मा कायद्याचे शिक्षण घेत होती. कुटुंबाकडून विरोध होणार हे माहित असल्याने दोघांनी लग्नाबद्दल गुप्तता बाळगली होती. चौधरी रेश्माला भेटण्यासाठी अनेकदा मंगळुरुला जायचा. मागच्यावर्षीपर्यंत चौधरी कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. जुलै 2017 मध्ये चौधरी मंगळुरुला जाऊन रेश्माला मुंबईत घेऊन आला. रेश्माने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर 15 जुलैला चेंबूरमध्ये त्यांचा निकाह झाला. त्यानंतर वांद्रे कोर्टात त्यांनी लग्नाची रीतसर नोंदणी केली.