नवी मुंबई : आपत्कालीन प्रसंगांत यंत्रणा सज्ज आहे का, याची घणसोलीतील डी मार्टमध्ये पोलिसांनी तालीम घेतली. त्यामध्ये मार्टमध्ये आग लागल्याचा संदेश देताच साडेतीन मिनिटांत संपूर्ण मार्ट रिकामे झाले. त्यानंतर नागरिकांना वस्तुस्थितीची कल्पना दिली.
एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास यंत्रणा सज्ज आहे का, हे तपासणीसाठी, तसेच नागरिक व यंत्रणेचा प्रतिसाद कसा मिळतोय याची तपासणी रबाळे पोलिसांनी घेतली. त्यासाठी घणसोलीतील डी मार्टमध्ये आग लागल्याची माहिती स्पीकरवर ग्राहकांना दिली. त्यानंतर अवघ्या साडेतीन मिनिटांत तीनशे ते साडेतीनशे नागरिक मार्टबाहेर पडले.
शिवाय इतरही यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. त्यानंतर रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दुलबा ढाकणे यांनी नागरिकांना ही तालीम असल्याची कल्पना दिली.
आपत्कालीन प्रसंगात काय करणार?अनेकदा गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास चेंगराचेंगरीची शक्यता असते. शिवाय कोणत्या उपकरणाचा वापर करायचा व कोणत्या नाही याची माहिती नसल्यानेही गोंधळ उडतो. त्याचीही माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. तसेच प्रात्यक्षिके दाखविण्यात आल्यामुळे कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे? याची माहिती नागरिकांना मिळाली.