नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढण्यासाठी २९ एप्रिल २०१९ मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवून, कामगारांनाही भरपगारी रजा देण्याचे आवाहन कामगार उपआयुक्त विश्राम देशपांडे यांनी केले आहे. या बाबतची माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील व्यापारी, दुकानदार, विविध कंपनी क्षेत्राला देण्यासाठी शुक्र वारी वाशीतील ग्रोमा हाउस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
मतदान हा देशसेवेचा एक भाग असून प्रत्येक मतदाराने मतदान करण्याचे आवाहन करीत दुकाने, कार्यालये बंद ठेवून कामगारांनादेखील मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन देशपांडे यांनी केले. मतदानासाठी कामगारांना देण्यात येणाऱ्या सुट्टीचा पगारदेखील कपात करण्यात येऊ नये, तसेच सुट्टीचा गैरफायदा घेत मतदान केल्याशिवाय कोठेही बाहेर फिरायला जाऊ नये, अशी सूचना त्यांनी केली.
एखाद्या ठिकाणी इतर राज्यातील कामगार काम करीत असले तरी सुट्टी देण्यात यावी. दवाखाने, रु ग्णालय, पॅथेलॉजी लॅब, मेडिकल आदी अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच दुकाने, कंपन्या, कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. बैठकीला नवी मुंबईतील निरीक्षक संजय बोटे, मेहदबीन पटेल, व्यापारी असोसिएशन, हॉटेल, आयटी कंपन्यांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.