सराफांच्या देशव्यापी बंदचा कारागिरांना फटका
By admin | Published: April 5, 2016 01:31 AM2016-04-05T01:31:39+5:302016-04-05T01:31:39+5:30
सराफांच्या देशव्यापी बंदमुळे लग्नसोहळ्यांवर परिणाम झाला आहे. सोन्याची दुकाने बंद असल्याने नकली दागिने घालून लग्नसमारंभ पार पाडले जात आहेत.
खोपोली : सराफांच्या देशव्यापी बंदमुळे लग्नसोहळ्यांवर परिणाम झाला आहे. सोन्याची दुकाने बंद असल्याने नकली दागिने घालून लग्नसमारंभ पार पाडले जात आहेत. केंद्र सरकार व सराफांच्या वादाचा फटका सोने, चांदीचे दागिने बनविणाऱ्या व दुकानाबाहेर दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना बसला आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ सराफांची दुकाने बंद असल्याने या कारागिरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. आणखी काही दिवस संप सुरू राहिला तर उपासमारीची वेळ कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांवर येणार आहे.
सोन्याच्या दागिन्यांच्या उत्पादनावर केंद्र सरकारने लावलेल्या अबकारी कराच्या विरोधात सराफांनी देशव्यापी संप पुकारला आहे. गेले ३५ दिवस यामुळे सोन्याची दुकाने बंद आहेत. याचा फटका सर्वसामान्यांनाही बसला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून, लग्न नकली दागिने घालून उरकण्यात येत आहेत. या बंदचा मोठा फटका सोन्याच्या दुकानात काम करणारे कामगार व दुकानाबाहेर दुरुस्तीची कामे करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या कारागिरांनाही बसला आहे. दुकाने बंद असल्याने हातावर पोट असलेले हे कारागीर आर्थिक संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यातील विविध दुकानांबाहेर उदरनिर्वाह करीत असलेल्या कारागिरांची संख्या ५०० पेक्षा जास्त आहे. केंद्र सरकार व सराफ आपल्या मतांवर ठाम असल्याने आणखी काही दिवस ही कोंडी सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे या कारागिरांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत. अशा प्रकारे काम करणारे कारागीर मोठ्या प्रमाणात अन्य राज्यांतून आलेले आहेत. स्थानिक कारागिरांची संख्या २५ टक्क्यांच्या आसपास आहे. पूर्णवेळ दागिन्यांची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना दिवसाकाठी ५०० रुपये मिळत होते. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र गेले काही दिवस दुकाने बंद असल्याने हे कारागीर हवालदिल झाले आहेत.