शॉर्टसर्किटने ३ कंपन्या खाक, खैरणे एमआयडीसीत कापूर बनविताना उडाली ठिणगी; कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 12:35 PM2024-04-03T12:35:07+5:302024-04-03T12:35:42+5:30

Navi Mumbai Fire: खैरणे एमआयडीसीमधील तीन कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्टसर्किट झाल्याने कापूरच्या पावडरवर ठिणगी उडाल्याने भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी पेट घेतला.

Short circuit kills 3 companies Khak, Khairne MIDC sparks while making camphor; Billions of losses | शॉर्टसर्किटने ३ कंपन्या खाक, खैरणे एमआयडीसीत कापूर बनविताना उडाली ठिणगी; कोट्यवधींचे नुकसान

शॉर्टसर्किटने ३ कंपन्या खाक, खैरणे एमआयडीसीत कापूर बनविताना उडाली ठिणगी; कोट्यवधींचे नुकसान

 नवी मुंबई - खैरणे एमआयडीसीमधील तीन कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्टसर्किट झाल्याने कापूरच्या पावडरवर ठिणगी उडाल्याने भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी पेट घेतला. तिन्ही कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने चौथ्या कंपनीला झळ बसली नाही. 

सकाळी १० च्या सुमारास खैरणे एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रिज या कंपनीत अचानक आग लागली. या कंपनीत कापूर, डांबरगोळ्या बनवण्याचे काम सुरू असताना एका मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. कामगारांनी आग शमविण्याचा प्रयत्न केला मात्र, काही क्षणात कापरच्या पावडरमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचा भडका पाहून कामगरांनी कंपनीबाहेर पळ काढला. तोपर्यंत कापूरसाठा व केमिकलने पेट घेतल्याने शेजारच्या गोयंका व जस्मिन या दोन कंपन्यांमध्ये आग पसरली. 

आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसी, पालिका, ओएनजीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये होणारे छोटे-मोठे स्फोट व आगीच्या भडक्यामुळे इतरही कंपन्यांना धोका निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी कामगारांच्या मदतीने लगतच्या कंपन्यांमधील ज्वलनशील पदार्थ, गॅस सिलिंडर बाहेर काढले. मात्र, कापूर व डांबरगोळ्यांचा साठा तसेच गोयंका गोडाऊनमधील साहित्य उशिरापर्यंत जळत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

पाण्याचा तुटवडा
आग आटोक्यात आणण्यासाठी सातहून अधिक बंब तर २० हून अधिक टँकर बचावकार्यात गुंतले होते. बचावकार्य सुरू असताना पहिल्या तासातच पाण्याचा तुटवडा भासून त्यात खंड पडला. अखेर परिसरातल्या कंपन्यांमधून पाणी घेऊन पुन्हा आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात झाली. त्यातही टाकीतले  पाणी थेट बंबात सोडता येत नसल्याने अग्निशमन जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

आगीच्या झळा
आग शमविण्याचे काम सुरू असताना अग्निशमन दलाच्या जवानांच्या थेट तोंडावर आगीच्या झळा बसत होत्या. अचानक आगीचा भडका उडत असल्याने त्यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यामध्ये काहींच्या डोळ्यांना तसेच चेहऱ्यावर किरकोळ दुखापती झाल्या आहेत. 

पाण्यामुळे आणखी पसरली आग
आग शमविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. कंपनीतून बाहेर येणाऱ्या त्या पाण्यासोबत कापूर व केमिकलदेखील वाहू लागले. या रसायनमिश्रित पाण्यानेही पेट घेतला. हे पाणी लगतच्या गोयंका व जस्मिन आर्ट या दोन कंपन्यांमध्ये वाहत गेल्याने तिथेही आग लागली. शिवाय रस्त्यालगतचे महावितरणचे विद्युत ट्रान्स्फार्मरदेखील जळाले. अखेर अग्निशमन दलाने फोमचा वापर करून रस्त्यावरून वाहणारे आगीचे लोट नियंत्रणात आणले.

Web Title: Short circuit kills 3 companies Khak, Khairne MIDC sparks while making camphor; Billions of losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.