नवी मुंबई : नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी फटाक्यांची दुकाने कमी प्रमाणात लागली असून, पाऊस आणि फटाक्यांच्या किमतीमध्ये झालेली दहा टक्क्यांची वाढ यामुळे फटाके खरेदीसाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद लाभत आहे. यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर शहरातील नागरिकांनी भर दिला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नवी मुंबई हे २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जात असून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर नागरिकांचा भर वाढला आहे. दिवाळीचा सण म्हणजे फटाक्यांची आतशबाजी हे समीकरण आता बदलत असून फटाके खरेदीला शहरातील नागरिकांनी अल्प प्रतिसाद दिला आहे, यामुळे फटाके विक्रे ते मात्र हवालदिल झाले आहेत.
नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी महापालिकेची परवानगी घेऊन फटाक्यांची दुकाने लावली जातात. फटाक्यांच्या किमतीमध्ये दरवर्षी वाढणारे दर यामुळे फटाके खरेदीसाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी लाभत असल्याने दुकानांची संख्याही कमी होऊ लागली आहे.
यावर्षी फटाक्यांच्या दरात सुमारे १५ ते २० टक्के भाववाढ झाली असून दिवाळी सुरू झाली तरी पाऊस पडत आहे, त्यामुळे नागरिकांचा दिवाळी सण साजरा करण्याचा उत्साह कमी झाला असून फटाके खरेदीसाठी नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे फटाके विक्रे त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.