तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा; बाजार समितीमध्ये आवक निम्म्यावर; भाज्यांचे दर वाढले
By नामदेव मोरे | Published: April 10, 2024 07:29 PM2024-04-10T19:29:14+5:302024-04-10T19:29:48+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५५० ते ६५० वाहनांमधून अडीच ते तीन हजार टन भाजीपाल्याची रोज आवक होत असते. परंतु उन्हाळ्यामुळे आवक घसरू लागली आहे.
नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये आवक निम्यावर आली आहे. कोथिंबीरसह सर्व पालेभाज्या, फ्लॉवर, काकडी, दोडका, भेंडी,दुधीभोपळासह अनेक भाज्यांचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५५० ते ६५० वाहनांमधून अडीच ते तीन हजार टन भाजीपाल्याची रोज आवक होत असते. परंतु उन्हाळ्यामुळे आवक घसरू लागली आहे. बुधवारी ४७२ वाहनांमधून १२८६ टन भाजीपाल्याचीच आवक झाली असून यामध्ये ५ लाख १४ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन महिने बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गत आठवड्याच्या तुलनेमध्ये भेंडी, दुधी भोपळा, फ्लॉवर,गाजर, घेवडा, काकडी, दोडका, कोथिंबीर, मेथी, पालक, पुदीना यांचेही दर वाढले आहेत.
फरसबी, कैरी यांचे दर कमी झाले असून गवार, शेवगा शेंग यांचे दर स्थिर आहेत. पाण्याची कमतरता असल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. मागणीप्रमाणे आवक होत नसल्यामुळे दर वाढत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
किरकोळ मार्केटमधील प्रतीकिलो बाजारभाव
भेंडी ८०, दुधी भोपळा ८०, फरसबी १०० ते १२०
फ्लॉवर ६०,गाजर ६० ते ७० , गवार १०० ते १२०, घेवडा १००, कैरी ८०, काकडी ५० ते ६०, कारली ८०, कोबी ५० ते ६०, ढोबळी मिर्ची ८० ते १००, शेवगा शेंग ८०, वाटाणा १०० ते १२० रुपये किलो. कोथिंबीर जुडी ३०, मेथी २०, पालक २० ते २५, पुदीना २० व शेपू २५ रुपये जुडी दराने किरकोळ मार्केटमध्ये विकली जात आहे.
भाजीपाल्याचे बाजार समितीमधील होलसेलचे दर वस्तू - ३ एप्रिल - १० एप्रिल
भेंडी - २४ ते ४० - ३० ते ५० - ८०
दुधी भोवळा १४ ते २२ - २० ते ३०
फ्लॉवर ७ ते १० - १० ते १४
गाजर - १६ ते २० - १८ ते २६
घेवडा २० ते ३० - ३० ते ३६
काकडी १० ते २० - १८ ते २८
दोडका - २२ ते २८ - ३० ते ४०