मुंबई, नवी मुंबईत भाजीपाल्याचा तुटवडा; वाटाणा, गवार, घेवडा, दोडक्याने ओलांडली शंभरी
By नामदेव मोरे | Published: June 3, 2024 07:55 PM2024-06-03T19:55:57+5:302024-06-03T19:56:27+5:30
फरसबीचे दर आठ पट वाढले; कोथिंबीरची एक जुडी ६० रुपयांना
नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. फरसबीचे दर एक आठवड्यात आठ पट वाढले आहेत. होलसेल मार्केटमध्ये १६० ते १८० व किरकोळ मार्केटमध्ये २५० ते २८० रुपये किलो दराने फरसबी विकली जात आहे. वाटाणा, गवार, घेवडा, दोडक्यानेही किरकोळ मार्केटमध्ये शंभरी ओलांडली असून, कोथिंबीरची एक जुडी ६० रुपयांना विकली जात आहे.
तीव्र उन्हाळा व पाणी टंचाईमुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही आवक कमी होऊ लागली आहे. सोमवारी ५४५ ट्रक, टेम्पोमधून २८१८ टन भाजीपाल्याची आवक झाली. त्यामध्ये ४ लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एक आठवड्यापूर्वी बाजार समितीमध्ये फरसबी २० ते २४ रुपये किलो दराने विकली जात होती. आता हेच दर १६० ते १८० रुपये किलोंवर पोहोचले आहेत. घेवडा २० ते २४ रुपयांवरून ४० ते ५० रुपयांवर गेला आहे. वाटाणा ३४ ते ४० वरून ९० ते १०० रुपये किलोवर पोहोचला आहे.
पालेभाज्यांचे दरही वाढू लागले आहेत. शेपू बाजार समितीमध्ये ३० ते ५० रुपये जुडी व किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ६० रुपयांचा विकली जात आहे. कोथिंबिरीच्या जुडीचे दर बाजार समितीमध्ये १५ ते ५० जुडीपर्यंत पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्ये एका जुडीसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत. पुढील काही दिवस बाजारभाव तेजीत राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बाजार समितीमधील भाजीपाल्याचे होलसेलचे दर
भाजी- २७ मे - ३ जून
फरसबी - २० ते २४ - १६० ते १८०
वाटाणा - ३४ ते ४० - ९० ते १००
भेंडी - १६ ते २८ - ३६ ते ५०
घेवडा - २० ते २४ - ४० ते ५०
दोडका - २४ ते ३२ - ४० ते ५०
कारले - ३० ते ४०- ३५ ते ४५
मिरची - ३४ ते ६० - ४० ते ८०
काकडी - १२ ते २० - १६ ते २६
किरकोळ मार्केटमधील प्रतिकिलोचे दर
फरसबी - २५० ते २८०
वाटाणा १४० ते १६०
भेंडी - ८०
घेवडा - १२०
दोडका - १२०
कारले - १००
मिरची - १००
काकडी - ६० ते ७०
गवार - १००