मार्केटमध्ये व्यापारासाठी जागेची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 04:50 AM2019-02-03T04:50:20+5:302019-02-03T04:50:56+5:30

बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये व्यापारासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. व्यापारी, कामगार व ग्राहकांना गर्दीतून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Shortage of space for trade in the market | मार्केटमध्ये व्यापारासाठी जागेची कमतरता

मार्केटमध्ये व्यापारासाठी जागेची कमतरता

Next

नवी मुंबई : बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये व्यापारासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. व्यापारी, कामगार व ग्राहकांना गर्दीतून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या दौऱ्यालाही अपुºया जागेचा फटका बसला. जागेची ही कमतरता दूर करण्यासाठी महामुंबई परिसरामध्ये नवीन मार्केटसाठी १५० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही व्यापाºयांनी केली आहे.

बाजार समितीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच पणनमंत्री मार्केटला भेट देणार असल्यामुळे व्यापारी, कामगारांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. मेळाव्यासाठी मंत्री येणार असल्यानंतर मार्केटची व्यवस्थित साफसफाई केली जाते. मार्केटमधील समस्या दिसणार नाही याची काळजी घेतली जाते; परंतु समस्या समजून घेण्यासाठीच मंत्री येणार असल्यामुळे व्यापारी व प्रशासनानेही मार्केट जसे आहे तसे पाहावयास मिळावे याची काळजी घेतली होती. मंत्री, अधिकारी व व्यापारी प्रतिनिधींनी ‘ए’ विंगपासून मार्केटची पाहणी करण्यास सुरुवात केली. मार्केटमध्ये प्रचंड गर्दीमुळे मोकळ्या पॅसेजमधून चालण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. एकच व्यक्ती एकावेळी जाईल एवढी वाट उपलब्ध झाली होती. मंत्री पॅसेजमधून जात असताना त्यांना अडथळे होऊ नयेत, यासाठी कामगारांना त्यांचे काम थांबवावे लागत होते. मार्केटमध्ये ट्रक व टेम्पोची गर्दी असल्यामुळे वाहतूककोंडी झाली होती. कोंडीतून मार्ग काढत मंत्र्यांनी चार विंगमध्ये भेट देऊन व्यापार कसा चालतो याची माहिती घेतली. व्यापारी व कामगारांशीही चर्चा केली. फळ मार्केटमध्येही गर्दीचा सामना करावा लागतला. मार्केटमधून चालताही येत नव्हते. अशा स्थितीत माथाडी कामगार रोज कसे काम करत असतील? असा प्रश्न मंत्र्यांनाही पडला.

भाजी व फळ मार्केटमधील व्यापाºयांनीही मार्केटमध्ये अपुरी जागा असून ती सोडविण्याची मागणी केली. भविष्यातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी महामुंबई परिसरामध्ये अजून नवीन मार्केट उभारण्याची आवश्यकता आहे. किमान १५० एकर जमीन टर्मिनल मार्केटसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. नवीन मार्केटमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणीही केली. उपलब्ध मार्केटलाही जादा एफएसआय उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती व्यापाºयांनी केली. धोकादायक झालेल्या कांदा-बटाटा मार्केटचीही सुभाष देशमुख यांनी पाहणी केली. कोणत्याही क्षणी मार्केट पडू शकते, यामुळे व्यापाºयांनी पुनर्बांधणीच्या कामासाठी एकत्र येऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्याचे आवाहनही देशमुख यांनी केले.

पहिल्या प्रयोगशाळेचीही पाहणी
बाजार समितीने इनाम प्रणाली सुरू केली असून, कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळाही सुरू केली आहे. राज्यातील या पहिल्या प्रयोगशाळेचीही मंत्र्यांनी पाहणी केली. बाजार समितीने सुरू केलेल्या सुधारणांविषयी समाधान व्यक्त केले.

खोकल्यासह शिंकांनी हैराण
भाजी मार्केटमध्ये मिर्चीचा व्यापार सुरू असलेल्या गाळ्यांमधून जात असताना अधिकारी व मंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्यांना शिंका व खोकल्याने हैराण केले. मिर्चीच्या गाळ्यांमध्ये पहिल्यांदाच आल्यामुळे येथील वातावरण अनेकांना सहन होत नव्हते, यामुळे येथे कामगार व व्यापारी रोज कसे काम करत असतील, असा प्रश्न अनेकांना पडला. पणनमंत्र्यांना मात्र या वातावरणाचा काहीही त्रास झाला नाही.

शेंगा खिशात टाकल्या
पणनमंत्र्यांच्या भाजी, फळ व कांदा-बटाटा मार्केटमधील दौºयामध्ये अधिकारी व व्यापाºयांसोबत इतरही अनेक हौशी व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. ५० पेक्षा जास्त जणांचा ताफा तीनही मार्केटमध्ये फिरत होता. भाजी मार्केटमधील भुईमूग शेंगांचा व्यापारी सुरू असलेल्या गाळ्यातून जात असताना अनेकांनी विक्रीसाठी आणलेल्या शेंगा खिशात टाकण्यास सुरुवात केली. फळ मार्केटच्या ओपन शेडमधून जाताना द्राक्षे व इतर फळेही काहींनी उचलून खाण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

मंत्र्यांपेक्षा अधिका-यांचा रुबाब मोठा
दौ-याच्या वेळी मंत्र्यांपेक्षा अधिका-यांचा रुबाब मोठा असल्याचे पाहावयास मिळाले.
पणनमंत्री इनोव्हा कारमधून आले होते, तर अधिकाºयांच्या दिमतीला फॉर्च्युनर कार होती.
प्रशासक सतीश सोनी स्वत: सूट-बूट घालून दौ-यात सहभागी झाले होते. इतर अधिकारीही रुबाबात वावरत होते. फक्त एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण अत्यंत साधेपणाने दौ-यात वावरताना आढळून आले.
अधिका-ºयांनी सूट-बूट व वातानुकूलित कार्यालय सोडून प्रत्येक आठवड्यात मार्केटला भेट द्यावी व येथील समस्या सोडवाव्यात, अशी चर्चा सुरू झाली होती.

बाजार समितीमध्ये व्यापार कसा चालतो व व्यापारी, कामगार, ग्राहक यांच्या समस्या समजून घेण्यासाठी हा दौरा आयोजित केला होता. मार्केटमध्ये जागेची अडचण असल्याचे निदर्शनास आले असून, व्यापारी व कामगारांनी निदर्शनास आणून दिलेल्या इतर समस्या सोडविण्यासही प्रयत्न केला जाईल.
- सुभाष देशमुख, पणनमंत्री

बाजार समितीच्या इतिहासामध्ये प्रथमच पणनमंत्र्यांनी ६ वाजता मार्केटला भेट देऊन अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. या दौºयामुळे येथील समस्या मार्गी लावण्यास सहकार्यच होणार आहे.
- नरेंद्र पाटील, माथाडी नेते

मार्केटमध्ये व्यापार कसा चालतो व येथील अडचणी काय आहेत, याची स्वत: मंत्र्यांनी पाहणी केल्यामुळे व्यापाºयांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. सर्वांना विश्वासात घेऊन नवीन बदल करण्याचे व येथील समस्या सोडविण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.
- शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी, भाजी मार्केट

मार्केटमध्ये जागेची अडचण असून, महामुंबई परिसरामध्ये नवीन टर्मिनल मार्केट उभारले पाहिजे. वाढीव एफएसआयसह इतर समस्या पणनमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत.
- संजय पानसरे,
व्यापारी प्रतिनिधी, फळ मार्केट

पहिल्यांदाच मंत्र्यांनी प्रत्यक्ष व्यापार कसा चालतो, याची पाहणी केली आहे. कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी करण्यात यावी. बाजार समितीमध्ये बदल करताना सर्वांना विश्वासात घेऊन ते करण्यात यावेत. येथील अडीअडचणी सोडविण्यात याव्यात.
- राजू मणिआर, व्यापारी, कांदा मार्केट

Web Title: Shortage of space for trade in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.