व्यावसायिकाच्या गाडीवर झाडल्या गोळ्या; पनवेलच्या खुटारी मधील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 12, 2023 06:25 PM2023-07-12T18:25:03+5:302023-07-12T18:25:21+5:30
पनवेलच्या खुटारी गावामध्ये बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या व्यावसायिकाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर गोळ्या झाडल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे.
नवी मुंबई: पनवेलच्या खुटारी गावामध्ये बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या व्यावसायिकाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर गोळ्या झाडल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने त्याच्याच चुलत भावावर आरोप केले आहेत. दोघांमध्ये व्यावसायिक वाद असल्याने त्या वादातून आपल्यावर हल्ल्याच्या उद्देशाने गोळीबार झाल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे.
बांधकाम साहित्य पुरवणारे व्यावसायिक राजकुमार म्हात्रे यांच्यासोबत बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. ते घरात झोपले असताना त्यांना घराबाहेर गोळीबार झाल्याचा आवाज आला. यामुळे त्यांनी बाहेर डोकावून पाहिले असता घराबाहेर चुलत भाऊ शरद म्हात्रे यांच्यासह काही व्यक्तीं दिसून आल्याचे राजकुमार यांचे म्हणणे आहे. तर दोन गोळ्या झाडल्यानंतर ते कारमधून निघून गेल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. खुटारी परिसरातल्या एका मोठ्या गृह प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकाम साहित्य पुरवण्यावरून दोघांमध्ये वाद आहेत.
त्या वादातून चुलत भावाने आपल्यावर हल्ल्याच्या उद्देशाने गोळ्या झाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात शरद म्हात्रे व इतर अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन रिकाम्या पुंगळ्या व एक जिवंत काडतूस मिळून आली आहे. दरम्यान तक्रारदार यांच्या आरोपानुसार घटनास्थळी शरद म्हात्रे कि इतर कोणी उपस्थित होते ? हे त्याठिकाणी उमटलेल्या गाडीच्या टायरच्या निशाणावरून पोलिस शोध घेत आहेत. त्यामुळे लवकरच या घटनेमागच्या वस्तुस्थितीचा उलगडा केला जाईल असाही विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.