सामान्यांनी दिवाळीची खरेदी आताच करायची काय?, डाळी महाग; पुढील काही महिन्यांत आणखी भाववाढीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:31 PM2023-08-28T12:31:00+5:302023-08-28T12:31:18+5:30
जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
नवी मुंबई : डाळी, कडधान्य हा सर्वसामान्य नागरिकांचा रोजचा आधार. भाजीपाला रोज खरेदी करणे शक्य होत नसल्यामुळे डाळी, कडधान्यावरच अनेकांना जीवन जगावे लागते. पण आता यांच्या किमतीही प्रचंड वाढत आहेत. पुढील काही महिन्यात यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे दिवाळीची खरेदी आताच करायची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रोज भाजीपाला खरेदी करणे सामान्य नागरिकांना परवडत नाही. एवढा पैसाही त्यांच्याजवळ नसतो. यामुळे डाळी, कडधान्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून या वस्तूंचे दर वाढत आहेत. होलसेल मार्केटमध्ये तूरडाळ ९५ ते १४५ रुपये किलो झाली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १५० ते १८० रुपयांवर पोहोचले आहेत. होलसेल मार्केटमध्ये उडीदडाळ ८० ते १२५ व मूगडाळ ८० ते १२८ रुपये किलो झाली आहे. डाळीही प्रतिकिलो दोनशेच्या घरात जाऊ लागल्यामुळे आता खायचे काय असा प्रश्नही काम करणाऱ्यांना पडला आहे.
...म्हणून वाढले दर
देशात कडधान्याचे उत्पादन कमी झाले आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक होत नसल्यामुळे दर वाढू लागले आहेत.
कडधान्याची आयातही पुरेशा प्रमाणात होत नसून या सर्वांमुळे दर वाढले आहेत.
कमी पावसामुळे वाढणार दर
यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. एक महिना सलग कोसळल्यानंतर पुन्हा गायब झाला आहे. यामुळे योग्य प्रमाणात पेरण्या झालेल्या नाहीत. पुरेसे उत्पादन होण्याची शक्यता नसल्यामुळे यापुढे दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.