नवी मुंबई : ‘अल् निनो’च्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची भीती आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने २६ मे रोजी घेतलेल्या बैठकीत बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ जूननंतर आता २३ जून असे दोन दिवस २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बारवीतून ठाणे जिल्ह्यातील महानगरांसह नवी मुंबईतील टीटीसी आणि तळोजा एमआयडीसीलाही पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा बंद केल्याने तळोजातील उद्योजक संतापले आहेत. आम्ही टँकरच्या पाण्यावर उद्योग चालवायचे का, असा प्रश्न त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये साडेतीनशेहून अधिक रासायनिक कारखान्यांना ५३ दश लक्ष लीटर पाणी लागते. गेल्या दोन वर्षांपासून या उद्योगांना सुरळीत पाणीपुरवठा होत होता. आता परंतु, अवघे ३८ एमएलडीच पाणी मिळत आहे. उर्वरित पाणी एमआयडीसीने वळविले आहे. यामुळे तळोजातील अनेक उद्योग दीड ते दोन हजार रुपयांना पाण्याचा एक टँकर खरेदी करून आपले उद्योग चालवित आहेत. परंतु, असे महागडे पाणी घेऊन उद्योग कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांनी सोमवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला आहे.हे कमी म्हणून की काय आता एमआयडीसीने बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबईसह डोंबिवली, अंबरनाथ आणि तळोजा एमआयडीसीतील उद्योगांचा पाणीपुरवठा आधी १६ जून आणि आता २३ जून रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा पाऊस लांबला आहे. आता २० जून ओलांडला तरी पावसाचा एक थेंब पडलेला नाही. धरणात पाणीसाठा कमी झाल्याने ही कपात आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज आहे. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांसह उद्योगांना बसत आहे. यात तळोजातील उद्योग अधिकच भरडले गेले आहेत. टँकरचे महागडे आणि तोकडे पाणी वापरण्यापेक्षा उद्योग बंद केलेले बरे, टँकरच्या पाण्यावर किती दिवस ते चालवायचे असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.