विद्यार्थ्यांनी पेन सोडून शस्त्रे घ्यावीत का?
By admin | Published: February 16, 2017 02:21 AM2017-02-16T02:21:54+5:302017-02-16T02:21:54+5:30
ऐन परीक्षेच्या काळात प्रशासनाकडून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई होत असल्याचा फटका त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या
नवी मुंबई : ऐन परीक्षेच्या काळात प्रशासनाकडून अनधिकृत झोपड्यांवर कारवाई होत असल्याचा फटका त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेन सोडून शस्त्रेहाती घ्यावीत का? असा संतप्त सवाल महापौर सुधाकर सोनावणे यांनी महासभेत प्रशासनाला केला, तर यापुढे कारवाई झाल्यास परिणामाची पर्वा न करता आडवा येईन, असा इशाराही त्यांनी दिला.
पालिका व एमआयडीसीच्या संयुक्त विद्यमाने यादवनगर, देवीधाम नगर परिसरात अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत त्याठिकाणच्या सन २००० नंतरच्या एक हजारहून अधिक अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. परंतु या कारवायांमध्ये शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली असून ऐन परीक्षा काळात अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत झोपडपट्टीधारकांवर होत असलेल्या कारवाईचा नगरसेविका संध्या यादव यांनी निषेध नोंदवला. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सभागृहात उभे राहून यादव यांना समर्थन दर्शवले. महापौर सुधाकर सोनावणे यांनी देखील झोपड्यांवर होणाऱ्या कारवायांबाबत संताप व्यक्त केला. लोकांना झोपड्यांमध्ये राहावे लागते हे शासनाचे अपयश आहे. गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध नाहीत म्हणून अनेकांना झोपड्यांचा आसरा घ्यावा लागत आहे, तर गावठाणांमध्ये गरजेपोटी घरे बांधली जात आहेत. अशा बांधकामांना नियमित करण्यासंबंधीचे धोरण राबवण्याऐवजी सरसकट कारवाया होत असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे यापुढे झोपड्यांवर कारवाई झाल्यास मी आडवा येईन, असा इशारा त्यांनी महासभेत प्रशासनाला दिला. तसेच झोपड्यांवर कारवाई न करण्याचा अशासकीय ठराव देखील महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक नामदेव भगत यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होईपर्यंत झोपड्यांवरील कारवाई प्रशासनाने थांबवायला हवी होती अशी भावना व्यक्त केली. शिवाय बांधकामांवर कारवाई केल्यानंतर त्याठिकाणी डेब्रिज मात्र प्रशासनाकडून उचलले जात नसल्याचा त्रास सर्वसामान्यांना होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी महापालिका एमआयडीसीच्या कार्यक्षेत्रात कारवाईवर का खर्च करतेय असा प्रश्न उपस्थित केला. तर महापौर व आयुक्त यांनी मान-सन्मान नाट्य थांबवून जनतेच्या कामांचाही विचार केला जावा असा टोला देखील मारला. नगरसेविका शुभांगी पाटील यांनी एपीएमसी आवारातील अवैध झोपड्यांमध्ये तसेच मॅफ्को मार्केटच्या पडीक इमारतीमध्ये अवैध धंदे होत असतानाही त्याठिकाणी मात्र कारवाई होत नसल्याचा संताप व्यक्त केला. यावेळी नगरसेवक अनंत सुतार यांनी आयुक्तांप्रती आदर राहिला नसून त्यांनीच नागरिक व लोकप्रतिनिधींचा तिरस्कार ओढावून घेतला असल्याचे सांगितले. तर केवळ यादवनगर तोडले म्हणजे शहर स्मार्ट सिटी झाले असे नसल्याचेही त्यांनी फटकारले. (प्रतिनिधी)