कळंबोली : पनवेल-दिवा रेल्वेमार्गावर खांदा वसाहतीतून नवीन पनवेलला जाण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. तर पादचाऱ्यांसाठी स्कायवॉक बांधण्यात आला आहे. मात्र, सध्या स्कायवॉकवर मद्यपींचा वावर वाढला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांमध्ये दशहत निर्माण होत असून रात्रीच्या वेळी या ठिकाणी पोलीस गस्त ठेवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.काही वर्षांपूर्वी खांदा वसाहतीतून नवीन पनवेलकडे जाण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडून जावे लागायचे. मात्र, जेएनपीटीकडे जाणाºया मालगाड्या, कोकणात, पुढे दक्षिण भारतात जाणाºया गाड्यांची संख्या वाढल्याने, त्याचबरोबरच अपघातांच्या घटना वाढल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात आले आणि उड्डाणपूल, स्कायवॉक बांधण्यात आला. पनवेलमधील उड्डाणपुलावर दररोज होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी नवीन पनवेल, आदई, विहिघर, नेरे आदी ठिकाणचे बहुतांश नागरिक याच उड्डाणपुलाचा वापर करतात. याच परिसरात रेयान इंटरनॅशनल, न्यू होरिझोन पब्लिक स्कूल, महात्मा स्कूल, फडके आदी शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह हजारो नागरिक स्कॉयवॉकवरून ये-जा करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्कायवॉकवर मद्यपींचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी मद्यपींकडून पादचाºयांना अश्लिल शेरेबाजी करण्यात येते. मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी रात्री काहींनी मद्यपान करून बाटल्या फोडल्या. यात एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. त्याच्या हातात काचा घुसल्या. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मद्यपींचा उच्छाद वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.रेल्वेरूळ ओलांडण्यासाठी उड्डणपूल बांधण्यात आला असला, तरी पूर्वी या ठिकाणी रेल्वे फाटक होते. त्यामुळे रेल्वे कामगारांना राहण्यासाठी कॉटर्स बांधले होते. आता ते ओस पडले असून, मोडकळीस आले आहेत. तिथे गर्दुल्ल्यांचा वावर असतो. स्कायवॉकवर प्रेमीयुगुलही अश्लिल चाळे करीत असल्याने नागरिकांना खाली मान खालून जावे लागते.पनवेल रेल्वे स्थानक परिसरात होणारी वाहतूककोंडी, पार्किं गच्या समस्येमुळे नवीन पनवेल, आदई, सुकापूर, विहिघर, नेरे परिसरात राहणारे बहुतांश नागरिक खांदा वसाहतीतील स्कायवॉकवरून ये-जा करतात.मात्र, रात्रीच्या वेळी मद्यपी, गर्दुल्ल्यांचे अड्डे जमत असल्याने नागरिकांमध्ये दशहत निर्माण झाली आहे.मंगळवारी मद्यपींकडून काचेच्या बाटल्या फोडण्यात आल्याने एक विद्यार्थी जखमी झाला. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.स्थानिक नगरसेवकांनाही या प्रकरणी निवेदन देण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.>रेल्वे पोलीस फोर्सचे दुर्लक्षपनवेल-दिवा मार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस दलाने योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने उड्डाणपुलावर मद्यपी, गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. अंधाराचा फायदा घेत लुटमारीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
खांदा वसाहतीतील स्कायवॉक बनलाय मद्यपी, गर्दुल्ल्यांचा अड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:09 PM