कर्तव्यावर नसल्याने ८ डॉक्टरांना पालिकेची कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 02:31 AM2020-12-09T02:31:20+5:302020-12-09T02:32:02+5:30
Navi Mumbai News : नवी मुंबई पालिकेने वाशीतील डेडिकेटेड काेविड हॉस्पिटलचे पुन्हा जनरल रुग्णालयात रूपांतर केले आहे. प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी यापूर्वीच प्रशासनास दिल्या.
नवी मुंबई : मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाला अचानक भेट दिली. पाहणीच्या वेळी ८ ऑनकॉल वैद्यकीय अधिकारी हजेरीपत्रकावर अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
नवी मुंबई पालिकेने वाशीतील डेडिकेटेड काेविड हॉस्पिटलचे पुन्हा जनरल रुग्णालयात रूपांतर केले आहे. प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी यापूर्वीच प्रशासनास दिल्या. रुग्णालयातील कामकाज कसे सुरू आहे, याची माहिती घेण्यासाठी आयुक्तांनी अचानक भेट दिली. रुग्णालयाच्या पाहणीच्या वेळी हजेरीपत्रक तपासले असता, ऑनकॉल मेडिकल ऑफिसर हजेरीपत्रकावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल घेऊन ८ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याविषयी खुलासा घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. हजेरी पत्रकात त्यांच्या यापूर्वीच्या काळातील उपस्थितीच्या स्वाक्षरी नसल्याचे आढळल्याने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयातील शौचालयाची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. येथील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.
वाशी रुग्णालयात कोरोना सुरू होण्यापूर्वीपेक्षा आता ओपीडीमधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्णालय पुन्हा सुरू झाल्याची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले. नागरी आरोग्य केंद्रांनाही याविषयी सूचना देण्यात याव्यात, रुग्णालयातील शस्रक्रियांची संख्याही वाढविण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले.
मनपाचे वाशी येथील रुग्णालय सर्वात मोठे असून, नागरिकांना वैद्यकीय आधार देणारे आहे. त्यामुळे तेथे अधिक चांगल्या सुविधा देता येतील, याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यापुढेही रुग्णालयांचा अचानक पाहणी दाैरा करण्यात येणार आहे.
-अभिजीत बांगर, आयुक्त, महानरपालिका